Tue, Apr 23, 2019 19:32होमपेज › Sangli › कडेगाव-पलूस तालुक्यात सन्नाटा

कडेगाव-पलूस तालुक्यात सन्नाटा

Published On: Mar 11 2018 1:09AM | Last Updated: Mar 10 2018 11:23PMकडेगाव : शहर प्रतिनिधी

कडेगाव-पलूस मतदारसंघांसह जिल्ह्याचे भाग्यविधाते, महाराष्ट्राचे लोकनेते, अजात शत्रू आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाचे वृत्त येताच शुक्रवारी रात्रीपासून कडेगाव तालुक्यात व परिसरात सन्नाटा पसरला. त्यांच्या अचानक निधनाने मतदारसंघात सर्वत्र शोकाकुल वातावरण झाले आहे.  दरम्यान, कडेगाव

-पलूस तालुक्यात जनतेने उत्स्फूर्तपणे व्यवहार बंद ठेवले.  अनेकांच्या घरातली चूलही पेटली नाही.

डॉ. पतंगराव कदम यांच्या अचानक निधनामुळे  मतदारसंघातील जनतेला मोठा धक्का बसला आहे.  कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. डॉ. कदम यांनी हजारो बेरोजगार युवकांचे संसार फुलवले, त्यामुळे घरचा कर्ता पुरुष गमावल्याचे चित्र दिसत होते. शनिवारी सकाळी तालुक्यातील सर्व बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.दोन्ही तालुक्यातील शाळा, महाविद्यालयात डॉ. कदम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तर अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली. गावागावांत तीन दिवसांचे सूतक पाळण्यात येणार आहे. कडेगाव, शाळगाव, कडेपूर, वांगी, सोनहिरा कारखाना, चिंचणी, सोनसळ, शिरसगाव, देवराष्ट्रे, नेर्ली, अपशिंगे आदी गावांसह सर्व गावोगावी डॉ. पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहणारे फलक लावण्यात आले. 

डॉ. पतंगराव कदम यांची मतदारसंघातील घरोघरी जवळीक होती. त्यांच्या आठवणींना अनेकांना गहिवरून येत आहे. लोकांना अश्रू अनावर झाले होते. विशेषत: महिला वर्ग मोठ्या प्रमाणात शोकाकुल आहे.  अनेक महिलांनी आपल्या अश्रूंना वाट करून देत त्यांना श्रद्धांजली वाहिली.  तालुक्यात अनेक घरामध्ये चुली पेटल्या नाहीत.   दरम्यान, चाहत्यांच्या आक्रोशाने संपूर्ण तालुका, सोनहिरा परिसर   हेलावला आहे. कंठात दाटलेले हुंदके, डोळ्यांतून ओघळणारे अश्रू आणि भावनावेगाने फोडलेला हंबरडा यामुळे सोनहिरा  कारखाना व सोनसळ  परिसरातील वातावरण शनिवारी  कमालीचे भावूक झाले होतेे.