Thu, Nov 15, 2018 22:09होमपेज › Sangli › वशीत धाक दाखवून महिलेचे सात तोळ्यांचे दागिने लुटले

वशीत धाक दाखवून महिलेचे सात तोळ्यांचे दागिने लुटले

Published On: Mar 18 2018 1:06AM | Last Updated: Mar 18 2018 12:19AMकुरळप : वार्ताहर

वशी (ता. वाळवा) येथे दोन अनोळखी व्यक्‍तींनी शनिवारी एका महिलेस धाक दाखवून तिचे सात तोळ्यांचे दागिने लुटले. याप्रकरणी श्रीमती सुनंदा सुकुमार पाटील (वय 60, रा. शिराळा) यांनी कुरळप पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

सुनंदा पाटील या वशी येथे देवदर्शनासाठी आल्या होत्या. देवदर्शन करून त्या घरी परत जात होत्या. वशी येथील मेथेवाडी चौकातील बस थांब्याजवळ दोन अनोळखी व्यक्‍ती मोटारसायकलवरून आल्या. त्यांनी मोटारसायकल आडवी उभी करून सुनंदा पाटील यांचे  दागिने काढून घेतले. सुनंदा पाटील यांनी चोरट्यांना विरोध केला. त्यावेळी  ‘आरडाओरडा केलास तर तुला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिली. सोन्याच्या चार बांगड्या, मणीमाळ, अंगठी असे सात तोळ्यांचे एक लाख दहा हजार रुपयांचे दागिने काढून घेऊन चोरटे इस्लामपूरच्या दिशेने पसार झाले.  सुनंदा पाटील भयभीत झाल्या होत्या. नातेवाइकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर कुरळप पोलिसांत फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक रफिक शेख तपास करीत आहेत.

Tags : vashi, showing fear,  woman, Jewelery, robbed,