Sun, Jul 21, 2019 15:06
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › मणेराजुरीत एकाचा गोळी घालून खून

मणेराजुरीत एकाचा गोळी घालून खून

Published On: Jul 08 2018 1:45AM | Last Updated: Jul 08 2018 1:45AMसांगली/तासगाव : प्रतिनिधी

मणेराजुरी (ता. तासगाव) येथे जीवन पांडुरंग माने (वय 55, रा.मणेराजुरी) यांचा पिस्तुलाने डोक्यात गोळी घालून खून केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. महेश दिलीप वाघमारे (26, रा. मणेराजुरी), वैभव अनिल सूर्यवंशी (25, रा. गोटेवाडी, ता. तासगाव), रोहित हणमंत वाघमारे (23, रा. मणेराजुरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पिस्तूल व जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. 

शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली होती. तासगाव पोलिसांनी वाघमारेला तर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सूर्यवंशीला अटक केली. बारा तासांत पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला. दोन वर्षांपूर्वी मिरवणुकीत झालेल्या वादातून हा खून केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. जीवन माने कुटुंबीयांसमवेत मणेराजुरीत राहत होते.

शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे जनावरे चरायला घेऊन शेतात गेले होते. सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान ते जनावरे घेऊन परत घरी जात असत. मात्र शुक्रवारी रात्री सात वाजले तरी ते न परतल्याने घरच्यांनी त्यांचा शोध सुरू केला. गावात सर्वत्र त्यांचा शोध घेतला. तेथे ते न सापडल्याने नातेवाईकांनी शेताकडे धाव घेतली; पण शेतातही ते सापडले नाहीत.

त्यांचा शेताच्या परिसरात शोध घेतल्यानंतर मणेराजुरी-सांगली रस्त्यापासून पन्नास फूट अंतरावर त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या डोक्यात वर्मी घाव बसल्याने अति रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी पंचनामा करीत असताना पोलिसांना  पिस्तुलाची पुंगळी आढळून आली होती. तसेच मृत माने यांचा मुलगा नितेश यानेही महेश वाघमारेवर संशय व्यक्‍त केला होता.  

रात्री साडेबाराच्या सुमारास मणेराजुरी येथील चौकातून एक चारचाकी व एक दुचाकी अतिशय वेगात गावात गेल्या. यावरुन पोलिसांना संशय आला. त्यांनी त्या वाहनांचा पाठलाग केला असता त्यामध्ये महेश आढळून आला. त्याला तासगाव पोलिस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली.

यावेळी महेशने  खून केल्याची कबुली दिली. तो म्हणाला, दोन वर्षांपूर्वी  आयोजित ऑर्केस्ट्रामध्ये महेश हुल्‍लडबाजी करत होता. त्यावेळी जीवन माने व त्याची वादावादी झाली होती. यातून  त्यांनी त्याला मारहाणही केली होती.गावासमोर झालेल्या या प्रकारामुळे महेश हा जीवन माने यांच्यावर चिडून होता. तो संधीच्या शोधात होता. यासाठी त्याने काही दिवसांपूर्वी परराज्यातून  देशी बनावटीचे पिस्तूलही आणले होते.

अखेर  माने यांच्यावर पाळत ठेवून ते जनावरे कधी घेऊन जातात, कधी येतात याची माहिती घेतली. शुक्रवारी  ते  जनावरे घेऊन सांगली रस्त्यावर गेले होते. त्यावेळी महेशने सायंकाळी सातच्या सुमारास त्यांना तिथे गाठले व जवळून कानाजवळ गोळी झाडली. जवळून गोळी मारल्याने ती  त्यांच्या डोक्यातून आरपार गेली व  त्यांचा जागेवर मृत्यू झाला.

माने यांच्या खुनाची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना संशयित वैभव सूर्यवंशी तासगाव-मणेराजुरी रस्त्यावरील एका पेट्रोल पंपाजवळ थांबल्याची माहिती मिळाली. त्यांनी पथकाला त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने तातडीने हालचाली करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याचा माने यांच्या खुनात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्याशिवाय त्याच्याकडे एक पिस्तूलही आढळले आहे. त्याला अटक करून तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक डगळे, निलेश कदम, चेतन महाजन, सचिन सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.