होमपेज › Sangli › महावितरणचा शॉक ; ४०३ जणांचा घात

महावितरणचा शॉक ; ४०३ जणांचा घात

Published On: Apr 29 2018 2:07AM | Last Updated: Apr 28 2018 11:59PMसांगली : मोहन यादव 

सांगली जिल्ह्यात गेल्या सात वर्षांत विजेचा शॉक लागून 403 जणांना जीव गमवावा लागला आहे.   242 जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. वर्षाला पीक जळण्याच्या सरासरी 300 घटना घडत आहेत. नुकसान भरपाईचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. 

महावितरणचे विजेचे खांब, तारा,  केबल, मीटर, बटने असे अनेक प्रकारचे जीर्ण साहित्य त्याचबरोबर ग्राहकांकडून होणारा वीजसाधनांचा चुकीचा वापर यामुळे शॉक लागण्याचे प्रमाण वाढत आहे. प्रामुख्याने वादळ-वार्‍यामुळे तुटलेल्या तारांचे धक्के बसून अनेकांना जीवाला मुकावे  लागत आहेत. जिल्ह्यात गेल्या  सात वर्षांपासून अशा अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. वर्षाला सरासरी 40 ते 60 जणांचा मृत्यू होत आहे. तर 20 ते 22 जण जखमी होत आहेत. 

मृत्यू झाल्यास अथवा पीक जळल्यास नुकसान भरपाई देण्याची कायदेशीर तरतूद आहे. त्यासाठी खास स्वतंत्र विद्युत निरीक्षक विभाग आहे. घटना घडल्यानंतर या विभागातील अधिकारी, कर्मचारी  पंचनामा करतात. या विभागाच्या पंचनाम्यानुसार बहुतांश अपघात हे महावितरणच्या चुकामुळे होत आहेत, असे स्पष्ट होत आहे. घरगुती अपघात घडण्याचे प्रमाण काहीसे कमी आहे. यात लोकांची  चुकीची हाताळणी कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. 

शॉक लागून मृत्यू झाल्यास अथवा पीक जळल्यास नुकसान भरपाई दिली जाते.  पण यासाठीची प्रक्रिया क्‍लिष्ट आहे. विद्युत निरीक्षक विभाग व पोलिसांचा पंचनामा, महावितरणाचा अहवाल अशा अनेक कागदपत्रांच्या जंजाळातून मदत मिळेपर्यंत अनेक वर्षे जातात. 

वीज अपघात टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी

काय करावे :    

विजेची कामे मान्यताप्राप्त ठेकेदारांकडूनच करुन घ्यावीत. वीज उपकरणे आयएसआय प्रमाणित व दर्जेदार वापरावित. शेतीपंपासाठी दोन स्वतंत्र अर्थिंग करुन ते  8 गेजच्या दुहेरी जीआय  तारांनी  मेन स्वीच पेटीशी जोडून घ्यावा. आर्थिंगसाठी तांब्याची प्लेट अथवा रॉडचा वापर करावा. तसेच अर्थ लिकेज सर्किट ब्रेकरचा वापर करावा. टू-पीन ऐवजी आर्थिंगची सोय असलेल्या थ्री-पीनचा व योग्य क्षमता असलेल्या फ्यूजचा वापर करावा. टिल्लू मोटारी काळजीपूर्वक हाताळाव्यात. वीज उपकरणे हाताळताना रबरी चप्पल किंवा गम शूजचा वापर करावा. 

काय करू नये :

विजेच्या तारेखाली  गोठा, शेतमाल, चारा ठेवू नये. वीज वाहिन्यांना अडथळे ठरणार्‍या झाडाच्या फांद्या परस्पर तोडू नयेत. फांद्यांचा अडथळा होत असल्यास महावितरणला कळवावे. शेतीला तारेचे कुंपण करुन वीज प्रवाह सोडू नये. ते व्यक्तीच्या तसेच वन्यजीवांच्या जीवावर बेतते. घरांतील विद्युत उपकरणे लहान मुलांना हाताळू देऊ नयेत. उपकरणे उंचीवर ठेवावीत. विद्युत सर्किटवर क्षमतेपेक्षा जास्त भार टाकू नका. रोहित्रातील फ्यूज, डिवो परस्पर टाकू नयेत.

Tags : Sangli district, MSEDCL shock, 403 people killed,