Fri, Apr 26, 2019 16:02होमपेज › Sangli › कितीही पाऊस पाडा, मतदार विकला जाणार नाही

कितीही पाऊस पाडा, मतदार विकला जाणार नाही

Published On: Apr 15 2018 11:02PM | Last Updated: Apr 15 2018 10:48PMसांगली : प्रतिनिधी

विरोधक लोकांना भावनिक आवाहन करीत आहेत. भेट वस्तू, पैशाचे अमिष दाखवित आहेत. त्यांनी कितीही पैशाचा पाऊस पाडला, तरी मतदार विकला जाणार नाही. यावेळी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेसह सर्व निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकेल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन  असे  शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर आणि खासदार अनिल देसाई यांनी केले. 

शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी येथील भावे नाट्यगृहात झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अनिल बाबर, जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानुगडे- पाटील, जिल्हा प्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे माजी उपाध्यक्ष दिगंबर जाधव, नगरसेवक  शेखर माने,  पृथ्वीराज पवार आदी उपस्थित होते. 

खा. किर्तीकर म्हणाले, गेल्या 22 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर सेनेचा भगवा फडकत आहे. तो सांगली महापालिकेवर का फडकू शकत नाही. मुंबई महापालिकेचे बजेट 35 हजार कोटींवर आहे. अनेक वर्षांपासून सत्ता आहे. तरी सुद्धा चांगला कारभार   चालू आहे. या महापालिकेवर सत्ता असलेल्यांनी या शहराच्या विकासासाठी काहीच केले नाही. त्यामुळे आपणाला काम करण्यासाठी मोठी संधी आहे. मतदारांची अगोदर मने जिंका. त्यांची कामे करा. झोकून देऊन कामाला लागा. येणार्‍या सर्व निवडणुकीत सध्याच्या जागा टिकवून आणखी जागा वाढवायच्या आहेत. 

खा. देसाई म्हणाले, आपल्या पक्षाची बांधिलकी केवळ सत्तेशी नसून जनतेशी आहे. या ठिकाणी आतापर्यंत विविध पक्षाची सत्ता असूनही विकास झाला नाही. त्यामुळे यावेळी जनता आपल्या पाठीशी राहील. ती विरोधकांच्या कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही. 

प्रा. बानुगडे - पाटील म्हणाले, आता निवडणुकीचे रणशिंग फुकले गेले आहे. सध्या धोकायंत्राची गर्दी आहे. शोषण करणारे आणि सत्तेत असलेले उपोषण करीत आहेत. त्यांनी कोणतीही आश्‍वासने पूर्ण केलेली नाहीत. प्रत्येक आठवड्याला भेट वस्तू देणारे विकास काय करणार. राजकारण नेहमीच दहशत आणि  पैशाच्या जोरावर करता येत नाही. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता वाघ असून आपणाला वाघांचा पक्ष वाढवायचा आहे. कोणीही वाघांच्या नादाला लागू नये. अन्यथा त्यांचे बुरखे आम्ही फाडल्या शिवाय राहणार नाही. 

आमदार बाबर म्हणाले, महापालिकेतील सत्ताधारी आतापर्यंत कोणत्याही सुविधा देऊ शकले नाहीत. माजी आमदार संभाजी पवार यांनी 28 वर्षांपूर्वी सांगलीच्या शेरीनाल्याचा  प्रश्‍न अधिवेशनात मांडला. सभागृह बंद पाडले. मात्र, अद्यापही हा प्रश्‍न  सुटलेला नाही. नागरी सुविधा देण्याची शर्यत जिंकण्यासाठी तयारीला लागा. सक्षम उमेदवार देऊन महापालिकेवर झेंडा फडकवा.