Thu, Apr 25, 2019 07:28होमपेज › Sangli › शिराळा आगारास प्रतिदिन तीन लाखांचा तोटा

शिराळा आगारास प्रतिदिन तीन लाखांचा तोटा

Published On: Mar 01 2018 1:28AM | Last Updated: Feb 28 2018 9:57PMशिराळा : विठ्ठल नलवडे

शिराळा एस. टी. आगाराची बेकायदा वडाप वाहतुकीमुळे तोट्याकडे वाटचाल सुरू आहे. प्रामुख्याने खासगी लक्झरी वाहतुकीचा आगारास मोठा फटका बसला आहे. प्रतिदिनी तीन लाख रुपयांचा तोटा आगारास सोसावा लागत आहे. तर वडापचा जोरदार फटका बसत आहे. दरम्यान, आगारास तोट्यातून बाहेर काढण्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांचे प्रयत्न सुरू आहेत.

शिराळा एस. टी. आगारात 78 बसगाड्या आहेत. त्या सरासरी प्रतिदिन 24 हजार 734 कि. मी. अंतर धावतात. प्रत्येक कि. मी. ला सरासरी उत्पन्न 29 रुपये 48 पैसे मिळते. तर प्रतिकिलोमीटर खर्च सरासरी 41 रुपये 50 पैसे आहे. प्रतिकिलोमीटर 12 रुपये 50 पैसे तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे आगारास दररोज 3 लाख रुपयांचा तोटा सोसावा लागत आहे. एका महिन्याचा तोटा हा 3 कोटी 60 लाखांच्या घरात जात आहे. हा तोटा यात्रांच्या हंगामात कमी जास्त होत आहे.

दरम्यान, शिराळा आगाराच्या बाहेर वडाप वाहतूकही मोठ्या प्रमाणात राजरोस सुरू आहे. प्रवासी मोठ्या प्रमाणात वडापकडे वळतात. विद्यार्थी फक्त एस.टी. चा सवलतीसाठी वापर करतात. तर त्यांचे पालक वडापकडे वळतात. वडापवाले एस.टी. अगोदर गाडी नेतात. 

इस्लामपूर, कोकरूड, लाडेगाव, मांगले, शिरशी, तडवळे, औंढी, सागाव या मार्गावर वडाप वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र त्याचा फटका आगारास बसत आहे. शिराळा आगाराच्या परळी, हैद्राबाद, बोरिवली, अक्कलकोट, बार्शी, सोलापूर, मुंबई या लांब पल्ल्यांच्या गाड्या आहेत. त्यातून शिराळा आगारास उत्पन्न मिळत असले तरी तोटा यातून भरून निघत नाही. नागपंचमी, पंढरपूर तसेच विविध गावच्या यात्रांच्या वेळी उत्पन्न जरी वाढ होत असली तर सरासरी तोटा होत आहे. 

मात्र आगारात चालक व वाहक यांची संख्या कमी आहे. त्या चालक व वाहकांवर कामाचा ताण पडतो. चालक सुमारे 132 तर वाहक 133 आहेत. वर्कशॉपमध्ये 53 तर प्रशासनाकडे 37 कर्मचारी आहेत. तर आगारातील कर्मचारी युनियनमध्ये असणार्‍या कुरबुरीचा फटका आगारास बसत आहे. 

शिराळा आगारातील कर्मचार्‍यांनी प्रवाशांसाठी सौजन्याने वागले पाहिजे. ‘हात दाखवा गाडी थांबवा’ अभियान राबविले पाहिजे. बेकायदा प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांचे सहकार्य आगारास मिळाले तर प्रवासी संख्या वाढून उत्पन्नात वाढ होईल. विद्यार्थी पास सवलत, अंध, अपंगांना तसेच ज्येष्ठ नागरिक, आजारी, खेळाडू, पत्रकार, अहिल्यादेवी होळकर योजना, विद्यार्थी, प्रासंगिक करार अशा विविध योजनांमुळे आगाराचा सवलतीसाठी मोठा वापर होत आहे. 

शिराळा एस. टी. आगाराची प्रशस्त इमारत झाली आहे. मात्र प्रवासी संख्या फारच कमी असते. आगाराने नवीन बसगाड्या आणून प्रवाशांना एस. टी. कडे वळविण्यासाठी प्रयत्न केले तरच आगाराच्या उत्पन्नात वाढ होईल.

मुंबईला जाण्यासाठी शिवशाही सुरू करण्याची गरज
शिराळा येथून मुंबईला जाणार्‍या खासगी लक्झरी बसगाड्यांची संख्या मोठी आहे. तालुक्यातून सरासरी 10 बसगाड्या रोज रात्री मुंबईस जातात. प्रवास आरामदायी, करमणुकीची साधने असल्यामुळे प्रवासी लक्झरीकडे वळले आहेत. तर मुंबईला एस.टी. ने रात्री जाणार्‍या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. शिवशाही बसगाड्या जर मुंबईला सुरू केल्या तर आगाराच्या उत्पन्नात वाढ होईल. मुंबईला मात्र शिराळा आगाराच्या एस.टी. बसगाड्या सकाळी सुरू आहेत. त्यामध्येही कमी प्रवासी असतात.