होमपेज › Sangli › शेरीनाल्याचे 40 कोटी पाण्यात

शेरीनाल्याचे 40 कोटी पाण्यात

Published On: Feb 06 2018 1:49AM | Last Updated: Feb 05 2018 10:34PMसांगली : प्रतिनिधी

कृष्णेची गटारगंगा करणार्‍या शेरीनाल्याचे प्रदूषण थोपविण्यासाठी शुद्धीकरण योजनेवर आत्तापर्यंत 40 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. तरीही अद्याप सांडपाणी नदीतच मिसळत आहे. त्यामुळे हा खर्च वायाच गेला आहे. 

एकीकडे नदीने तळ गाठल्याने शुद्ध पाण्यात आता गटारगंगा नव्हे तर गटारगंगेत शुद्ध पाणी, अशी अवस्था आहे. माशांसह अन्य जलचर या रसायनयुक्‍त विषारी पाण्यामुळे मरू लागले आहेत. तरीही धरणातून विसर्गासाठी समन्वय नाही. एकूणच मनपा प्रशासन आणि पाटबंधारे विभाग निवांतच आहे. 

अशा थेट नदी प्रदूषणाबद्दल महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार नोटिसा दिल्या. त्यापोटी वार्षिक दीड कोटी रुपयांहून अधिक दंडही भरावा लागतो आहे. गेल्या चार वर्षांत सुमारे आठ  कोटी रुपये दंड भरला, तरीही तरीही हे प्रदूषण रोखण्याबाबत काहीच हालचाली नाहीत. त्यामुळे नागरिक हैराण आहेत.

शेरीनाल्याची गेल्या तीन-चार दशकांहून अधिक काळ डोकेदुखी होती. त्या सांडपाण्यामुळे मोठे प्रदूषण होते. ते रोखण्यासाठी शेरीनाला शुद्धीकरण योजना राबविण्यात आली. शहराचे सांडपाणी थेट धुळगाव येथे नेऊन शुद्धीकरण करून शेतीला देण्यासाठी प्रकल्प राबविला आहे. त्यावर आजअखेर 38-40 कोटी रुपये खर्च झाले आहेत. परंतु अद्याप ती योजना शंभर टक्के यशस्वी झाली नाही. जिझिया मारुती मंदिर ते अमरधाम स्मशानभूमीपर्यंत नदीकाठाने शहराची गटारगंगा नदीत मिसळते. शिवाय शेरीनाल्याकडूनही माधवनगर रस्ता, औद्योगिक वसाहतीमार्गे येणारे सांडपाणी नदीत मिसळतच आहे. 

हे सांडपाणी थोपविण्यासाठी आयर्विन पूल ते बंधार्‍यापर्यंत पाईपलाईनही करण्यात आली आहे. ती पाईपलाईन अमरधाम स्मशानभूमीजवळ शेतातून जोडण्याचे काम करावयाचे आहे. त्यापोटी दोन-अडीच लाख रुपये शेतकर्‍याला नुकसानभरपाईचा प्रस्ताव दीड-दोन वर्षांपासून अडकून पडला आहे. त्यामुळे संपूर्ण गटारगंगा नदीतच मिसळत आहे. 

आता नदीने तळ गाठल्याने पुन्हा गेल्या आठवडाभरापासून प्रदूषणात वाढ झाली आहे. या रसायनमिश्रित व शेरीनाल्यासह सर्वच गटारगंगेमुळे शनिवारी व रविवारी नदीत मोठ्या प्रमाणात मासे मृत झाले. आता याचा परिणाम मागे जॅकवेलजवळ पाणी साठून मागे होण्याचा धोका आहे. तरीही अद्याप महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग आणि पाटबंधारे विभाग शांतच आहे. पुन्हा अशा कारभाराने  साथीचा फैलाव झाल्यावर यंत्रणा जागी होणार का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.