होमपेज › Sangli › विट्यात जप्‍त वाळू ट्रक पळवून नेले

विट्यात जप्‍त वाळू ट्रक पळवून नेले

Published On: Feb 01 2018 1:38AM | Last Updated: Jan 31 2018 11:48PMविटा : वार्ताहर 

पंढरपूर परिसरातून सांगली जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू वाहतूक करणार्‍यांनी मंगळवारी रात्री विट्यात अक्षरशः थैमान घातले. तहसीलदारांनी जप्त केलेले वाळूचे ट्रक पळवून नेताना गेटची कुलपे तोडण्यात आली. तसेच लगतची कंपाऊंडची भिंतही पाडून टाकण्यात आली.

याप्रकरणी  25 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. चौघांना ताब्यात घेतले आहे. हे सर्व जण सोलापूर जिल्ह्यातील असून वाहनांसह त्यांच्याकडील 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  याबाबत जमीन महसूल अधिनियम  व गौणखनिज अधिनियमानुसार कारवाई करणार असल्याचे तहसीलदार रंजना उंबरहंडे यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  तलाठी सुभाष यादव यांना पंढरपूरहून विटामार्गे सांगलीकडे चोरटी वाळू वाहतूक होत असल्याचा फोन मंगळवारी रात्री आला. तहसीलदार उंबरहंडे यांच्या नेतृत्वाखाली मंडल अधिकारी एम. डी. पाटील, तलाठी एस. व्ही. यादव, विनायक पाटील, फैयाज मुल्‍ला, सत्यवान सुर्वे, संजय जाधव यांच्या पथकाने कुंडल रस्त्यावर  वाळूचा ट्रक पाठलाग करून पकडला. त्याच्याकडे वाळूचा परवाना नव्हता.

लक्ष्मण मारुती डोईफोडे रा.अकलूज (जि.सोलापूर) असे त्याने नाव सांगितले. दहा ते पंधरा मिनिटांनी पाठीमागून वाळूचे आणखी चार ट्रक आले. ते या  पथकाने पकडले. तहसीलदारांनी 5 ट्रक ताब्यात घेतले आणि पोलिसांना बोलाविले.  बाबा चंदनशिवे (रा.वेळापूर, ट्रक क्र. एम.एच.45-3656), कुमार मेटकरी (रा. सांगोले, ट्रक क्र. एम.एच.45-1586), शहाजी चव्हाण (रा. तोडले बोधले, क्र.एम.एच.12-9532), लक्ष्मण मारूती डोईफोडे (ट्रक क्र.एम.एच.12-एम,व्ही, -46) व सुहार पवार (रा. वाटुंबरे,  ट्रक क्र. एम.एच.45-9664) या  सर्वांना  ताब्यात घेतले.  त्यांचे ट्रक तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यास कर्मचार्‍यांना सांगितले. 

यावेळी सुहास पवार याने त्याच्या मालकीचा वाळूचा ट्रक तहसील कार्यालयाच्या आवारात नेण्याचा बहाणा करीत पळवून नेला. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास चार ट्रक महसूल भवनच्या कपांऊंडच्या आत उभे केले. त्यावेळी ट्रकच्या किल्ल्या महसूल कर्मचार्‍यांना न देता तेथून चालकांनी पलायन केले. 

महसूल कर्मचार्‍यांनी कंपाऊंडच्या गेटला कुलूप लावले. तिथे   वाळूचा डंपर  गेटशेजारी आडवा लावला. परंतु मध्यरात्री या सर्वांनी अंधाराचा फायदा घेत डंपर गेटच्या पुढे नेला. गेटची कुलुपे तोडून ट्रक बाहेर काढले. त्यावेळी कंपाउंडची भिंतही पाडून टाकली.

या सर्वांनी आणलेल्या दोन कारसह 12 ते 15 जणांवर विटा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तसेच त्यांच्याकडून 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी श्रीकांत उर्फ किशोर मासाळ,लक्ष्मण दोईफोडे,रणजीत लक्ष्मण दोईफोडे आणि तुकाराम अभिमान कांबळे यांना ताब्यात घेतले आहे.