Sat, Nov 17, 2018 18:41



होमपेज › Sangli › परवान्यापेक्षा जास्त खते, बियाणे जप्त करा : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत 

परवान्यापेक्षा जास्त खते, बियाणे जप्त करा : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत 

Published On: Jun 15 2018 7:00PM | Last Updated: Jun 15 2018 7:00PM



सांगली : प्रतिनिधी

खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना  बियाणे, खते यांचा पुरेसा  साठा  उपलब्ध करून द्या. फसवणूक टाळण्यासाठी यंत्रणांनी दक्ष राहून  अप्रमाणित बियाणे, खते, कीटकनाशके यांचा साठा जप्त करून संबधीतांच्यावर गुन्हे  दाखल करा, असे आदेश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे दिले. कृषी, फलोत्पादन, पणन, पेरणी हंगाम यांबाबत आढावा घेण्यासाठी मंत्री  खोत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात  बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम - पाटील,  आमदार विलासराव जगताप,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, अग्रणी बँकेचे लक्ष्मीकांत कट्टी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले, जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे आदी  उपस्थित होते.

दरम्यान खोत यांनी द्राक्षे पिकास वर्षभर विमा संरक्षण मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करून देण्याचे आदेशही त्यांनी दिले. मंत्री  खोत म्हणाले,  पेरणी हंगामात लोकप्रतिनिधी आणि कृषी विभागातील शिपायापासून अधिकारी यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जावून त्यांच्याशी संवाद साधावा. त्यांना मार्गदर्शन करावे. प्रत्येक तालुक्यात पेरणीसाठी आपण स्वत: उपस्थित राहणार आहे. कृषि यांत्रिकीकरणासाठी गतवर्षी जिल्ह्याला 16 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला होता. या तुलनेत यावर्षी दीडपट निधी अधिक उपलब्ध करून दिला जाईल. त्या दृष्टीने कामांना पूर्वसंमती द्यावी.  ते म्हणाले, राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत 8 हजार 326 लोकांना 18 कोटी 67 लाख रूपयांचे अनुदान अदा करण्यात आले असून उर्वरित 4 हजार 600 प्रस्तावांसाठीही 15 दिवसात अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल.  13 कोटी वृक्षलागवड उपक्रमांतर्गत जिल्ह्यात कृषि विभागाला 2 लाख 40 हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट आहे. याच्या पूर्तीमध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग घ्यावा.

यावेळी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत समृध्द जनकल्याण योजना, विविध विस्तार योजना, राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजना, राष्ट्रीय फलोत्पादन विकास, कृषि विभागातील जिल्ह्यातील विविध रिक्त पदे आदि विषयांचा सविस्तर आढावा घेतला. 

जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, पीक कर्ज वितरणामध्ये जिल्ह्याला सुमारे 2100 कोटींचे उद्दिष्ट असून आजपर्यंत 34 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. ज्या बँकांनी पीक कर्ज वितरणामध्ये समाधानकारक कामगिरी केली नाही, त्यांची बैठक घेवून 24 जूनपर्यंत उद्दिष्ट पूर्तीचे आदेश दिले आहेत. पीक कर्ज वितरणामध्ये   जिल्हा तिसर्‍या क्रमांकावरअसून उद्दिष्ट पूर्तीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. 

यावेळी स्वातंत्र्य सैनिक क्रांतीवीर पांडु मास्तर स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त निवड झालेल्या वाळवा तालुक्यातील रेठरे धरण येथे समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून होत असलेल्या  कामांचा आढावा घेण्यात आला.  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या मातोश्री सरोजिनी देशमुख यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.