होमपेज › Sangli › शाळा कंपनीकरणाविरोधात आंदोलन

शाळा कंपनीकरणाविरोधात आंदोलन

Published On: Jan 28 2018 1:33AM | Last Updated: Jan 27 2018 11:32PMसांगली : प्रतिनिधी

शाळांचे कंपनीकरण करून बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा शासनाचा डाव आहे. याविरोधात जनआंदोलन उभारण्याचा निर्धार विविध सामाजिक संघटनांच्या बैठकीत करण्यात आला. यासंदर्भात 10 फेब्रुवारी रोजी सांगलीत व्यापक बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. 

येथील कामगार भवनमध्ये टी. डी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी अ‍ॅड. अजित सूर्यवंशी, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, प्रा. सुभाष दगडे, मधुकर पद्माळकर, विद्यार्थी संघटनेचे सचिन सव्वाखंडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रा. कांबळे म्हणाले, शासनाने 10 पेक्षा कमी पटसंख्या असणार्‍या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच शाळांचे कंपनीकरण करण्याचा डाव आहे. बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा त्यांचा डाव आहे. वाजपेयींचे सरकार असताना शून्य ते 14 वयोगटापर्यंतचे मोफत शिक्षण बंद करण्यात आले. आता त्यापुढचेही शिक्षण बंद करण्याचा शासनाचा डाव आहे. त्यामुळे शून्य ते 14 वयोगटापर्यंत पुन्हा मोफत शिक्षण सुरू करावे,  याविरोधात जनआंदोलन उभारल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी याविरोधात मसुदा तयार करण्यात येणार आहे. 10 फेब्रुवारीला कामगार भवन येथे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची व्यापक बैठक होणार आहे.