Mon, Jan 21, 2019 21:47होमपेज › Sangli › मिरज रेल्वे स्थानकातील स्कॅनिंग मशीन बंद

मिरज रेल्वे स्थानकातील स्कॅनिंग मशीन बंद

Published On: Jun 20 2018 1:39AM | Last Updated: Jun 19 2018 11:47PMमिरज : प्रतिनिधी

रेल्वे स्थानकात प्रवेशद्वाराजवळ प्रवासी बॅगा तपासणीकरिता बसविण्यात आलेले स्कॅनिंग मशीन  चार दिवसांपासून बंद पडले आहे. रेल्वे स्थानकात येणार्‍या प्रवाशांच्या बॅगा तपासणीकरिता रेल्वेने स्कॅनिंग मशीन बसविले आहे. आरपीएफच्या (रेल्वे सुरक्षा बल) नियंत्रणाखाली हे मशीन असून या ठिकाणी आरपीएफ जवानांची नेमणूकही करण्यात आलेली आहे. 

प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास करताना संशयास्पद वस्तू बॅगेतून नेऊ नयेत. तसेच स्कॅनिंगमध्ये अशा वस्तू आढळल्यास संबंधीतांविरुद्ध कारवाई करता यावी. याकरिता स्कॅनिंग मशीन बसविण्यात आले आहे. परंतु ते  अधूनमधून बंद पडते.

मिरज स्थानकात 24 तासांमध्ये 70 ते 75 गाड्या ये-जा करतात. यामध्ये पॅसेंजर, एक्स्प्रेस, सुपरफास्ट एक्स्प्रेस, संपर्कक्रांती, हमसफर एक्स्प्रेस इत्यादी गाड्यांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने गोवा, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यातून उत्तरेकडे पुणे, मुंबई, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश आणि दिल्लीकडे जाणार्‍या महत्वाच्या गाड्यांचा समावेश आहे. या सर्व गाड्यांच्या माध्यमातून लाखाच्या वर प्रवासी प्रवास करतात. 

स्कॅनिंग मशीन बसविल्यापासून एकाही बॅगेतून आक्षेपार्ह वस्तू आढळून आलेली नाही. दिवसभरात व रात्री नियमितपणे प्रवाशांच्या बॅगा तपासणीचे काम सुरू असते. परंतु या मशिनची देखभाल दुरुस्ती वेळेवर होत नाही. मशीन बंद पडल्यानंतरच दुरुस्तीचे काम केले जाते. मिरज रेल्वे स्थानक दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील महत्वाचे स्थानक आहे. 

स्थानकामध्ये येण्या-जाण्याच्या प्रवेशद्वारावर स्कॅनिंग मशीन आणि पोलिस बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे असले तरी स्थानकामध्ये प्लॅटफार्मवर जाण्याकरीता अन्य वाटाही आहेत. त्यामुळे स्थानकातील सुरक्षा व्यवस्था तशी रामभरोेसेच आहे.