Thu, Jul 18, 2019 04:09



होमपेज › Sangli › कुस्तीची अपुर्वाची 'अपूर्वाई'

कुस्तीची अपुर्वाची 'अपूर्वाई'

Published On: Apr 09 2018 1:31AM | Last Updated: Apr 08 2018 11:29PM



पुढारी ऑनलाईन

सांगली जिल्हा लाल मातीतील कुस्तीसाठी एक नामांकित जिल्हा आहे. या जिल्ह्यातील आतापर्यंत अनेक राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी, डबल महाराष्ट्र केसरी आदी किताब पटकाविणारे कुस्तीगीर दिले आहेत. जिल्ह्यात आता जिगरबाज महिला कुस्तीगीरांची देखील फळी होऊ लागली आहे. यातच आता कृष्णाकाठच्या अपूर्वा पाटील हिची मॅटवरील कुस्तीतील अपूर्वाई अधोरेखित होऊ लागली आहे. अपूर्वा पाटील पलूसची! घरात कुस्तीचीच चर्चा. कारण तिचे  वडील (स्व.) संभाजी पाटील हे एक उत्तम कुस्तीगीर होते.  भिलवडी महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून त्यांनी काम केले होते. तर याचदरम्यान त्यांनी  अनेक राज्य, राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणारे कुस्तीगीर तयार केले. अपूर्वाच्या आई भारती संभाजी पाटील या प्राध्यापिका तर  आजोबा जालिंदर शिंदे हे  (जरंडी) निवृत शिक्षक आणि महत्वाचे म्हणजे नामवंत पैलवान  होते.

मामा  सूर्यकांत शिंदे हे देखील विटा येथील आदर्श कॉलेजमध्ये क्रीडा संचालक म्हणून कार्यरत!  घरी आणि आजोळी कुस्तीचेच वातावरण आणि घरची तालीम यामुळे अपूर्वाला कुस्तीची लहानपणापासूनच आवड निर्माण झाली. खरे तर अपूर्वाला शैक्षणिक क्षेत्रात जाणे फारसे अवघड नव्हते. तरीसुद्धा  जाणीवपूर्वक कुस्तीकडे वळण्याचे धाडस अपूर्वाने केले. सध्या ती बुधगाव येथे पद्मभूषण  वसंतरावदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकत आहे. ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने भारताला कांस्यपदक मिळवून दिले.  सांगली जिल्ह्यातील  कौशल्या वाघ हिने देखील  राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर तसेच पहिली एनआयएस डिप्लोमा  प्राप्त होण्याचा मान पटकावला. तसेच ती शिवछत्रपती पुरस्काराची देखील मानकरी ठरली. जिगरबाज अपूर्वा ही परंपरा पुढे नेण्यासाठी दंड थोपटत आहे. अपूर्वाने आतापर्यंत शालेयस्तरावर आठ आणि चार राष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या आहेत.  

शासकीय, संघटना आयोजित  सब ज्युनियर, किशोर , कुमार, वरिष्ठ  स्पर्धा गाजविल्या.  शिवाजी विद्यापीठाकडून रोहतक येथे खेळताना अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत, नागपूर येथे राज्य वरिष्ठ महिला फ्री स्टाईल कुस्तीत भाग घेऊन  नेत्रदीपक कामगिरी केली. यातूनच तिची आता  मुंबई येथे होणार्‍या (स्व.) खाशाबा जाधव राज्यस्तरीय फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेसाठी सांगली जिल्हा तालीम संघाच्यावतीने निवड झाली आहे. यात देखील ती जिल्ह्याचे नाव उंचाविणारी कामगिरी करेल, असा तिला विश्‍वास आहे. अपूर्वा सध्या उशांत क्रीडा व्यायाम मंडळाच्या कुस्ती केंद्रात आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील,  सुहास पाटील , अनिल बुर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करत आहे. शास्त्रशुद्ध नियंत्रित आहार,  दूध  थंडाई, फ्रुट ज्युस, शाकाहारी  तसेच मांसाहारी आहार याकडे तिचे बारकाईने लक्ष असते.  ऑलिंपिकमध्ये पदक पटकावून आई, वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती जोरदार तयारी करत आहे.  सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त नामदेवराव मोहिते यांचे तिला मार्गदर्शन लाभत आहे. कृष्णाकाठची कुस्तीतील अपूर्वाची अपूर्वाई आता सातासमुद्रापार ऑलिंपिक पदकावर मोहोर उमटविण्यासाठी दंड थोपटते आहे.