Fri, Jun 05, 2020 16:04
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › 'काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराचा त्रास पुन्हा कशासाठी लावून घ्यायचा'?

'काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराचा त्रास पुन्हा कशासाठी लावून घ्यायचा'?

Last Updated: Oct 16 2019 5:07PM

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरेविटा : प्रतिनिधी

काँग्रेस-राष्ट्रवादीची चांगली माणसे आमच्याकडे आली आहेत, त्यामुळे आता राज्यात विरोधकच शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे यंदा निवडणूक आहे असे वातावरण कुठेच वाटत नाही. गेल्या पाच वर्षांत आमच्या सरकारने जी कामगिरी केली त्याच्यावर लोक खुश आहेत, असा दावा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला. 

राज्यात आचारसंहिता लागू झाल्या त्याआधीपासून महाराष्ट्रभरात फिरतोय. सांगली कोल्हापूरला पुर आला त्यावेळेला सुद्धा मी येऊन गेलो. आमच्या सरकारने रस्ता, पाणी, वीज या मूलभूत गरजेच्या गोष्टी पूर्ण  केल्या आहेत. आपल्याला आता राज्यात शिवशाहीचे सरकार आणावयाचे आहे. त्यासाठी एकदिलानं एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. राज्यात  विरोधीपक्ष हतबल झालेला आहे. विरोधातच कोणी असलेले दिसत नाही. सगळीकडे मला भगवे वातावरण दिसत आहे असे आदित्य म्हणाले. 

1995 ते 2000 आणि 2014 ते 2019 या काळात राज्यात युती सरकारने अनेक प्रकल्प पूर्ण केले. लोकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, मधल्या पंधरा वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभारामुळे लोकांना प्रचंड त्रास झाला. तो त्रास पुन्हा कशासाठी लावून घ्यायचा? मी महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने जेव्हा फिरलो तेव्हा लक्षात आले लोकांना शिवशाहीचे सरकार पाहिजे आहे. अनेकांनी मला मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले, पण मला लोकांसाठी काम करायचे आहे. मला आमदार बाबर यांच्यासारखा मार्गदर्शक विधानसभेत पाहिजे आहे, त्यासाठी तुम्ही तुमची सगळी ताकद पणाला लावून जास्तीत जास्त मतांनी बाबर यांना निवडून द्या असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी खासदार संजय  पाटील, आमदार अनिल बाबर, माजी आमदार राजेंद्र देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, तानाजीराव पाटील ,हर्षवर्धन देशमुख, राजवर्धन घोरपडे, रवीद्र देशमुख, नंदकुमार पाटील, नगरसेवक अमोल बाबर, शिवाजी शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.