Thu, Jul 18, 2019 04:35होमपेज › Sangli › सांगलीत वाहतूक, पार्किंगचा उडाला फज्जा

सांगलीत वाहतूक, पार्किंगचा उडाला फज्जा

Published On: Feb 04 2018 10:56PM | Last Updated: Feb 04 2018 8:42PMसांगली : प्रतिनिधी

सांगली शहरातील वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थेचा फज्जा उडालेला आहे. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी आणि प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा  त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे. महापालिका आणि पोलिस प्रशासन हा प्रश्‍न सोडवण्यात अपयशी ठरल्याने सर्वपक्षीय कृती समितीने आता जिल्हाधिकार्‍यांकडे धाव घेतली आहे. 

दरम्यान, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांनी या प्रश्‍नांची गंभीर दखल घेऊन मंगळवारी बैठक बोलवली आहे. पोलिस प्रशासन, महापालिका, बांधकाम, नगरभूमापन या विभागांना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत तरी या प्रश्‍नावर कायम स्वरुपी तोडगा निघून कार्यवाही होणार का? याकडे आता लक्ष लागले आहे.

शहरात अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी, अपघात हा एक भाग तर दुसर्‍या बाजूला   प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे.  शहरातील मुख्य बाजारपेठेत जसे अतिक्रमण आहे तसे उपनगरातही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत आहे. हॉटेल, दुकाने यांच्या शेड रस्त्यावर आल्या आहेत. शहरातील अनेक हॉटेल्स्मध्ये येणार्‍या ग्राहकांच्या वाहनासाठी पार्किंग व्यवस्थाच नाही. त्यामुळे हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी असतात. मोठ्या इमारती, अपार्टमेंट या ठिकाणी असलेल्या तळघराचा वापर केवळ वाहन पार्किंगसाठी करावा, अशी कायद्यात तरतुद आहे. प्रत्यक्षात मात्र बहुतेक ठिकाणी या तळघराचा वापर व्यापारी कारणासाठी होत आहे.    सांगली शहरातील वाहतूक व्यवस्थेची कोंडी कमी करण्यासाठी बायपास रस्त्यांचे नियोजन केले आहे.  हे रस्ते शंभर आणि दीडशे फुटी आहेत. मात्र या रस्त्यांची कामे काही ठिकाणी  अद्याप पूर्ण झालेली नाहीत. माधवनगर ते मिरज या  रस्त्यावरील अतिक्रमण अद्याप पूर्णपणे हटलेले नाही.   

विश्रामबाग येथील महावितरण कार्यालयापासून कोल्हापूर रस्त्यापर्यंत शंभरफुटी रस्ता हा केवळ नावालाच शंभरफुटी उरला आहे. प्रत्यक्षात तो 25 फूट देखील राहिलेला नाही. अनेक गॅरेज मालक, दुकानदारांनी या रस्त्यावरच अतिक्रमण केले आहे. रस्त्याच्या मध्यभागी वीज आणि टेलिफोनचे लोखंडी खांब धोकादायक स्थितीत   आहेत. कचरा कुंड्याही रस्त्यात मध्यभागी आहेत. हा रस्ता व्यवस्थित झाल्यास अवजड वाहने, बस वळल्यास शहरातील  वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.  अवजड वाहनांची एकेरी वाहतूक सुरू केल्यास डॉ. आंबेडकर मार्गावरील बराच ताण कमी होणार आहे. या शिवाय शहरातील चौकात फेरीवाले, रिक्षा, दुकानदार यांचे झालेले अतिक्रमण कमी करणे गरजेचे आहे. शहरात वाहतुकीची कोंडी कमी झाल्यास पोलिसांवरील ताणही  कमी होणार आहे.  शहरातील वाहतूक आणि पार्किंग संदर्भात मंगळवारी होणार्‍या बैठकीत तरी ठोस निर्णय होऊन प्रत्यक्ष कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे.

आताची बैठक तरी ठरू नये फार्स
 तत्कालीन जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह,  तत्कालीन आयुक्त दत्तात्रय मेतके यांनी स्वतः रस्त्यावर उतरत अतिक्रमण काढण्यासाठी धडक मोहीम राबवली. नंतर अनेक बैठका झाल्या.  मोहिमा राबविल्या. मात्र त्या केवळ फार्सच ठरल्या आहेत. आता मंगळवारच्या बैठकीत तरी ठोस निर्णय आणि त्याची कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे. 

एसएफसी मेगामॉल जवळील लूट थांबणार कधी
येथील एसएफसी मेगामॉलमध्ये येणार्‍या वाहनचालकांकडून पार्किंगच्या नावाखाली लूट सुरू आहे. त्या विरोधात विविध संघटनांनी आंदोलन केले. महापालिकेच्या बैठकीतही त्यावर खडाजंगी झाली, तरी हा प्रश्‍न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी येणार्‍या वाहनधारकांची लूट थांबणार कधी, असा प्रश्‍न नागरिकांसमोर आहे. 

आठवडा बाजार वर्षानुवर्षे रस्त्यातील धुळीतच
सांगली शहर आणि उपनगरात बहुतेक ठिकाणी आठवडा बाजार रस्त्यावरच भरत आहे. त्यामुळे गटाराकडील धुळीत असलेली भाजी नागरिकांना घ्यावी लागते.  महापालिका क्षेत्रात अनेक खुले भूखंड आहेत. त्या ठिकाणी हे बाजार स्थलांतरीत करता येऊ शकतात. मात्र त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.