Sat, Jul 20, 2019 21:27होमपेज › Sangli › जम्बो प्रभागरचनेमुळे विद्यमान आमने-सामने

जम्बो प्रभागरचनेमुळे विद्यमान आमने-सामने

Published On: Mar 21 2018 1:43AM | Last Updated: Mar 20 2018 9:54PMसांगली : अमृत चौगुले 

महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना आणि प्रभागनिहाय आरक्षण मंगळवारी खुले झाले. यामध्ये जम्बो आकाराच्या प्रभागामुळे अनेक विद्यमान नगरसेवक व  पदाधिकार्‍यांचे सध्याचे प्रभाग जोडले आहेत. काहीजणांच्या प्रभागाचे तीन-चार तुकडे झाले आहेत. गटनेते किशोर जामदार, स्थायी समितीचे सभापती बसवेश्‍वर सातपुते, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, माजी विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी आदींसह अनेकांना झटका बसला आहे.माजी महापौर विवेक कांबळे यांना मात्र दिलासा मिळाला आहे. 

महाकाय प्रभागात एकीकडे सात-आठ विद्यमान सदस्य, तर दुसरीकडे  काँग्रेस-राष्ट्रवादीतील काही आजी-माजी नगरसेवक - पदाधिकार्‍यांची पंचाईतही झाली आहे. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना, जिल्हा सुधार समिती, मिरज संघर्ष समिती, आम आदमी पार्टीसह विविध पक्षांतून आरक्षणानुसार कोण उमेदवार कसे रिंगणात  उतरणार, याकडे लक्ष  आहे. 

आरक्षणामुळे पत्ते कट झाल्याने विद्यमान आणि इच्छुकांची खुल्या प्रवर्गासाठी मोठी रस्सीखेच होणार आहे. अनेक ठिकाणी विद्यमान सदस्यांतच आमने-सामने लढत होणार आहे. सांगलीत 11, मिरजेत 6 तर कुपवाडमध्ये तीन प्रभाग आहेत.  25 ते 27  हजार मतदारसंख्येचे प्रभाग आहेत. साहजिकच पूर्वीपेक्षा  प्रभागांचा आकार किमान दुप्पट झाला आहे. कुपवाडच्या प्रभाग एकमध्ये विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, उपमहापौर विजय घाडगे, माजी महापौर प्रशांत पाटील, ज्येष्ठ नगरसेवक धनपाल खोत, सुलोचना खोत, निर्मला जगदाळे, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांचा समावेश आहे. 

अनुसूचित जातीमधून मोहिते यांना संधी मिळत असली तरी त्यांचा केवळ 30 टक्केच प्रभाग यात समाविष्ट आहे. उर्वरित एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व एक खुला प्रवर्ग महिला, तर केवळ एक जागा खुल्या प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे खोत, पाटील, घाडगे हे आमने-सामने उभे ठाकणार आहेत. प्रभाग दोनमध्ये सुरेखा कांबळे, धनपाल खोत, गजानन मगदूम, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांचा जुना  प्रभाग जोडला आहे.  अनुसूचित जाती महिलासाठी राखीव झाल्याने मोहिते यांचा पत्ता कट झाला आहे.  दोन जागा खुल्या झाल्याने या गटात इच्छुकांची संख्या वाढणार आहे. 
प्रभाग तीनमध्ये कुपवाड व मिरज असे जुने दोन-तीन प्रभाग जोडले आहेत. तिथे सुरेश आवटी, शिवाजी दुर्वे, धोंडुबाई कलकुटगी, जुबेर चौधरी, सौ. शांता जाधव, सुरेखा कांबळे यांचा समावेश आहे. येथे  एकच जागा खुली असल्याने येथेही चुरस  आहे. ओबीसी पुरूष गटात शिवाजी दुर्वे, जुबेर चौधरी हे नगरसेवक आमने सामने येतील. 

जामदार यांच्या प्रभागाचे चार तुकडे झाले आहेत. त्यातील एक भाग नव्या प्रभाग चारमध्ये आहे. त्यामध्ये जामदार यांच्यासह निरंजन आवटी, सुरेश आवटी, भाजपचे पांडुरंग कोरे व अनिलभाऊ कुलकर्णी, मकरंद देशपांडे यांचा समावेश आहे. या सर्वांना एकमेकांविरुद्ध झुंझावे लागेल.प्रभाग पाचमध्ये पुन्हा जामदार यांच्यासह  सभापती  सातपुते, माजी सभापती संजय मेंढे आदींचा समावेश आहे. या प्रभागात अनुसूचित जातीसाठी राखीव जागा नसल्याने  सातपुते यांचा पत्ता कट झाला आहे.  जामदार व  मेंढे हे दोघेही आरक्षणामुळे बचावले आहेत. या प्रभागात महिलासाठी दोन जागा राखीव असल्याने पुन्हा बबिता मेंढे यांना संधी मिळू शकते. 

प्रभाग सहामध्ये पुन्हा जामदार, माजी महापौर इद्रिस नायकवडी व मैनुद्दीन बागवान, नगरसेविका जरिना बागवान, नगरसेवक अल्लाउद्दीन काझी व शुभांगी देवमाने (नव्या प्रभागरचनेतून) एकत्र आले आहेत. या प्रभागात एक जागा खुली तर एक नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. उर्वरित दोन जागा खुल्या प्रवर्ग महिलांसाठी आहे. उमेदवारीसाठी मिरज पॅटर्न कसा ठरतो यावर चुरस रंगणार आहे.

प्रभाग सातसाठी तर विद्यमान आठ सदस्यांचे जुने प्रभाग तुकडे करून जोडलेे आहेत. यामध्ये शुभांगी देवमाने, अल्लाउद्दीन काझी, धोंडुबाई कलकुटगी, प्रार्थना मदभावीकर, संगीता खोत, निरंजन आवटी यांचा समावेश आहे. या प्रभागात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तर खुला प्रवर्ग महिला राखीव असल्याने काझी यांचा पत्ता कट होऊ शकतो. किंवा त्यांना खुल्या प्रवर्गातून उभे रहावे लागेल. कलकुटगी यांना संधी मिळू शकते. सौ. देवमाने यांना किंवा त्यांचे पती माजी नगरसेवक आनंद देवमाने यांना येथे  आरक्षण असल्याने उमेदवारीची संधी आहे. 

विजयनगर ते वॉन्लेसवाडी मार्गे कुपवाडपर्यंत पसरलेल्या प्रभाग आठमध्ये धनपाल खोत, विष्णू माने, सुरेखा कांबळे व स्नेहा औंधकर, शेडजी मोहिते यांचा सध्याचा प्रभाग समाविष्ट आहे.  खोत  येथे उभे राहिले तर विष्णु माने आणि त्यांची लढत होऊ शकते. अर्थात या प्रभागात दोन जागा खुल्या असल्याने  इच्छुकांची संख्या वाढणार आहे. 

प्रभाग नऊमध्ये काँग्रेसनेते (कै.) मदन पाटील यांचे निवासस्थान  आणि सह्याद्रीनगर परिसर आहे. हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. हा प्रभाग सह्याद्रीनगरमार्गे संजयनगर, यशवंतनगरपर्यंत जोडला आहे. यामध्ये  माजी सभापती संतोष पाटील, नगरसेविका रोहिणी पाटील, मनगु सरगर व प्रशांत पाटील, गुलजार पेंढारी यांच्या सध्याच्या प्रभागाचा समावेश आहे.  आरक्षणात हे सर्वजण बचावले आहेत. परंतु दोन्ही पक्षांत अनेकजण इच्छुक आहेत. शिवाय भाजप-शिवसेनेही या प्रभागात मोठी बांधणी केली आहे. 

प्रभाग दहामध्ये माजी उपमहापौर प्रशांत पाटील मजलेकर - सुनीता खोत यांच्या प्रभागाला ताणून थेट रेल्वे स्थानक, टिंबर एरिया पर्यंत नेण्यात आले आहे. यामध्ये स्वाभिमानीचे गटनेते जगन्नाथ ठोकळे, शेवंता वाघमारे, अनारकली कुरणे, माधुरी कलगुटगी या विद्यमान सदस्यांचा समावेश आहे. शिवाय युवानेते अमर निंबाळकर, प्रकाश मुळके, अशोक मासाळे, मुन्ना कुरणे आदी इच्छुक आहेत. यामुळे आरक्षणानुसार कसे पॅनेल होणार, यावरच चुरस रंगणार आहे.

चिंतामणनगर ते कारखाना परिसर, अहिल्यानगरपर्यंत पसरलेल्या प्रभाग 11 मध्ये मोठी चुरस आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील,  काँग्रेसचे युवानेते विशाल पाटील यांचा हा प्रभाग आहे. या प्रभागात विद्यमान उमेश पाटील, सुनीता पाटील, धीरज सूर्यवंशी, बाळासाहेब काकडे, आशा शिंदे तसेच संजयनगरहून माजी महापौर कांचन कांबळे, गुलजार पेंढारी यांचा प्रभाग जोडला आहे. यामुळे काँग्रेस अंतर्गत कशी एकी होते? भाजप, राष्ट्रवादीकडून कोण मैदानात उतरणार यावर चुरस रंगणार आहे.

गणपती पेठ मगरमच्छ कॉलनी ते शिंदे मळा - शांतिनिकेतन, कारखाना परिसरापर्यंत हा प्रभाग जोडला आहे. यामध्ये धीरज सूर्यवंशी, बाळासाहेब काकडे, आशा शिंदे यांचा समावेश आहे. 
सांगलीवाडीच्या प्रभाग 13 मध्ये कोणताही बदल झालेला नाही. गावाच्या हद्दीनुसार प्रभागरचना आणि  आरक्षणातही ‘जैसे थे’ परिस्थिती राहिली आहे. हा प्रभाग तीनचाच झाला आहे. यामध्ये नगरसेवक दिलीप पाटील, हरिदास पाटील, माजी आमदार दिनकर पाटील यांचे पुत्र अजिंक्य पाटील, पुतणे उमेश पाटील यांच्यात खुल्या गटात चुरस असेल. नागरिकांचा मागास प्रवर्गातून पांडुरंग भिसे, खुला प्रवर्ग महिलामधून सौ. वंदना कदम यांच्यासह आणखी कोण रिंगणात उतरते यावर मतांची बेरीज ठरू शकते.

प्रभाग 14 हा गणपती पेठ गवळी गल्ली ते गावभाग, सिद्धार्थ परिसर, हरिपूर रस्ता ते रामनगरपर्यंत पसरला आहे. या प्रभागात माजी उपमहापौर युवराज बावडेकर, शिवराज बोळाज, बाळासाहेब गोंधळे, बाळासाहेब काकडे, आशा शिंदे, सौ. अलका पवार या विद्यमान सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये एकच खुल्या प्रवर्गाच्या जागेसाठी बावडेकर, बोळाज, काकडे  आमने-सामने ठाकणार आहेत. याच प्रभागात माजी नगरसेवक हणमंत पवार, भाजपचे हणमंत पवार, शरद नलावडे, केदार खाडिलकर, बापू हरिदास आदी इच्छुक आहेत. महिलांच्या खुल्या प्रवर्गातून भारती दिगडेंंचा उमेदवारीसाठी दावा आहे.  माजी आमदार संभाजी पवार यांचा हा बालेकिल्ला. पण त्यांनी भाजपमधून फारकत घेतल्यानंतर ही पहिलीच महापालिका निवडणूक होत आहे. यामुळे नगरसेवक गौतम पवार, पृथ्वीराज पवार 
यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. 

प्रभाग 15 मध्ये शालन चव्हाण, किशोर लाटणे, महेंद्र सावंत, स्नेहल सावंत यांचा प्रभाग एक झाला आहे. अनुसूचित जातीचे आरक्षण नसल्याने स्नेहल सावंत यांना दुसर्‍या प्रभागात जावे लागेल. तर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मंगेश चव्हाण, विक्रम सावर्डेकर, रणजित सावर्डेकर हे खुल्या गटात एकमेकांसमोर असतील. 

प्रभाग 16 मध्ये खणभाग व नळभाग एकत्र करण्यात आला आहे. महापौर हारूण शिकलगार, स्थायी समितीचे सभापती राजेश नाईक, पुष्पलता पाटील एकाच प्रभागात आले आहेत. पण एक जागा खुली व एक ओबीसीसाठी असल्याने दोघांनाही संधी मिळणार आहे. प्रभाग 17 मध्ये दिग्विजय सूर्यवंशी, मृणाल पाटील यांचे प्रभाग एक केले आहेत. या प्रभागात खुल्या गटात सूर्यवंशी यांच्यासह भाजपचे शेखर इनामदार, संजय कुलकर्णी मैदानात उतरतील. प्रभाग 18 हा  नगरसेवक राजू गवळी, शकुंतला भोसले, अलका पवार, बाळासाहेब गोंधळे, महेंद्र सावंत, सौ. स्नेहल सावंत यांचे प्रभाग जोडून झाला आहे.  या प्रभागात आरक्षण असल्याने  स्नेहल सावंत रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.दोन जागा खुल्या गटासाठी असल्याने विद्यमान नगरसेवकांत चुरस असेल. 
धामणी रस्ता, गव्हर्मेंट कॉलनी ते वॉन्लेसवाडीपर्यंत पसरलेल्या प्रभाग 19 मध्ये युवराज गायकवाड, प्रियंका  बंडगर, प्रदीप पाटील, मृणाल पाटील, संगीता खोत या विद्यमान सदस्यांचा समावेश आहे. या प्रभागात दोन जागा खुल्या असल्याने गायकवाड, विनायक सिंहासने, महेश कर्णी, सुभाष चिक्कोडीकर रिंगणात उतरणार आहेत. 

मिरजेत प्रभाग 20 मध्ये विवेक कांबळे, संजय मेंढे, संगीता हारगे, संगीता खोत यांचा प्रभाग एक झाला आहे. या प्रभागात अनुसूचित जमातीचे आरक्षण असल्याने विवेक कांबळे व संगीता हारगे हे दोघेही सुरक्षित आहेत.

Tags : sangli, sangli news, sangli municiple corporation, allotment,  wards, current corporators, face