होमपेज › Sangli › बंडखोरी थोपविण्यासाठी नेत्यांकडून धावाधाव!

बंडखोरी थोपविण्यासाठी नेत्यांकडून धावाधाव!

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 14 2018 12:56AMसांगली ः प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने सर्वच पक्षांत बंडखोरी उफाळली आहे. बंडखोरांनी एकीची मोट बांधण्यास सुरुवात केल्याने सर्वपक्षीय नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. या बंडोबांना शांत करण्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी धावाधाव सुरू केली आहे. प्रमुख इच्छुकांना भेटून, मध्यस्थ पाठवून नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. माघारीची मुदत दि. 17 जुलैपर्यंत आहे. तोपर्यंत हे माघारनाट्य रंगणार आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपमध्ये नाराजांची संख्या अधिक आहे. भाजपला थोपविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेकांचे पत्ते कापले गेले आहेत.भाजपनेही इनकमिंगसाठी शेवटपर्यंत प्रतिक्षा केली. त्यानुसार ऐनवेळी पक्षात आलेल्या काहींना उमेदवारी दिली. त्यामुळे निष्ठावंत उमेदवार नाराज झाले आहेत. या नाराजांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करीत पक्षश्रेष्ठींना आव्हान दिले आहे. जनतेच्या दरबारात आमचा निर्णय होईल, असे सांगत बंडखोरीची भाषा सुरू केली आहे. 

यामुळे आता सर्वच पक्षांसमोर या बंडखोरांना थोपविण्याचे मोठे आव्हान आहे. यामध्ये सर्वपक्षीयांचे नेतृत्च नगरसेवक राजेश नाईक करीत आहेत.  त्यामुळे  त्यांचीच नाराजी दूर करण्याचा प्रयत्न नेत्यांनी चालविला आहे. यासाठी गुरुवारी रात्री वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, नगरसेवक संतोष पाटील यांनी नाईक यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.  अर्ज माघारीपर्यंत  योग्य तोडगा काढू. तोपर्यंत काहीही हालचाल करू नका, असे सांगितले. पण नाईक यांनी ती मागणी धुडकावली.

भाजपतर्फे  आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, प्रदेश चिटणीस मकरंद देशपंडे, माजी उपमहापौर शेखर इनामदार यांनी नाराजांशी संपर्क साधून समजुतीचा प्रयत्न केला. परंतु त्यांनाही यश आले नाही. राष्ट्रवादीतील नाराजांचीही समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते.

माजी महापौरांसह भाजपच्या चौघांचे अर्ज वैध

भाजपचे प्रभाग क्रमांक 20 मधील उमेदवार व माजी महापौर विवेक कांबळे यांच्यासह भाजपच्या चार उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. ही  माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील यांनी दिली. अर्ज छाननीच्या वेळी  भाजपच्या चार उमेदवारांविरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी हरकत घेतली होती. त्यावर गुरुवारी सुनावणी घेण्यात आली होती.  निकाल राखून ठेवण्यात आला होता.

प्रभाग क्र. 7 मधून भाजपचे उमेदवार गणेश माळी हे ठेकेदार असून त्यांची उमेदवारी रद्द करावी, अशी हरकत माजी महापौर किशोर जामदार यांचे चिरंजीव करण जामदार व हबीब शेख यांनी  घेतली होती.  याच प्रभागातील संगीता खोत यांच्याविरुद्ध धोंडीबाई कलगुटगी यांनी हरकत घेतली होती.तसेच प्रभाग क्र. 20 मधील माजी महापौर विवेक कांबळे यांनी विनापरवाना बांधकाम केले असून त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी हरकत राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात यांनी घेतली होती.  जयश्री कुरणे यांची मालमत्ता थकबाकी प्रकरणी उमेदवारी रद्द करावी अशी हरकत राष्ट्रवादीच्या संगीता हारगे यांनी घेतली होती.

शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी  पाटील यांनी वरील सर्व हरकती प्रबळ पुराव्याअभावी फेटाळून लावल्या.  कांबळे, माळी,  खोत व  कुरणे या चौघांचे उमेदवारी अर्ज वैध ठरविले. दरम्यान विवेक कांबळे यांच्या विरुद्ध हरकत घेतलेले राष्ट्रवादीचे उमेदवार योगेंद्र थोरात यांनी या निर्णया विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.