होमपेज › Sangli › तहकूब महासभा आज प्रशासन टार्गेट

तहकूब महासभा आज प्रशासन टार्गेट

Published On: Dec 18 2017 2:42AM | Last Updated: Dec 17 2017 11:46PM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

आयुक्तांच्या उपस्थितीसाठी तहकूब केलेली महासभा सोमवारी होणार आहे. विकासकामांवरून आयुक्त-महापौर, राष्ट्रवादीचे वादंग सुरूच आहे. राष्ट्रवादीने केलेल्या मागणीनुसार आयुक्तांनी लेखी आश्‍वासन दिलेले नाही शिवाय आयुक्त पुण्याला बैठकीमुळे पुन्हा सभेला उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे पुन्हा यावरून वाद उफाळण्याची शक्यता आहे. प्रसंगी यातून महासभा पुन्हा स्थगितीचे सावट आहे.
महापालिका निवडणूक सहा महिन्यावर आली आहे. परंतु खेबुडकर यांनी विकासकामे अडविल्याचा आरोप करीत महापौर, राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. श्री. खेबुडकर यांनी मात्र 188 कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केल्याचा दावा केला आहे.

प्रशासनाला जाणीवपूर्वक टार्गेट करून खच्चीकरणाचा डाव असल्याचीही टीका त्यांनी केली आहे. यातून सत्ताधारी-विरोधक विरुद्ध आयुक्त असा उभा संघर्ष सुरू आहे. यातून महापौरांनी आयुक्तांवर तोफ डागली आहे. राष्ट्रवादीचे आंदोलनही झाले. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्या मध्यस्तीनंतर आयुक्त-राष्ट्रवादी वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न झाले. त्यामध्ये आयुक्तांना प्रलंबित फाईली मार्गी लावून विकासकामे 10 दिवसांत करण्याचे टार्गेट दिले आहे. तसे त्यांनी लेखी देण्याचीही कमिटमेंट होती. परंतु ती त्यांनी पाळली नसल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून होत आहे. नागरी समस्यांचा खेबुडकर यांच्यासमोरच सोक्ष-मोक्ष झाला पाहिजे, असा सर्वांचा पवित्रा आहे. त्यामुळेच मागे सभा तहकूब केली होती. ती सभा आज आहे. परंतु खेबुडकर यांनी सभेला उपस्थितीची सक्ती नसल्याचा पवित्रा घेतला आहे. आज पुण्याला ते बैठकीला जाणार आहेत. त्यामुळे पुन्हा त्यांची अनुपस्थिती वादाचा विषय ठरणार आहे.