Thu, Jun 20, 2019 00:31होमपेज › Sangli › नाराजांसह बंडखोरांचा बंदोबस्त करा

नाराजांसह बंडखोरांचा बंदोबस्त करा

Published On: Aug 06 2018 1:55AM | Last Updated: Aug 05 2018 11:05PMसांगली : प्रतिनिधी

काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नाराज आणि बंडखोर उमेदवारांमुळेच आघाडीला महापालिका निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याशिवाय काही प्रभागात भाजपने ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केला त्यामुळे आघाडीला सत्तेपासून दूर रहावे लागले. ज्या नाराज आणि बंडखोरांमुळे पराभव झाला अशांचा बंदोबस्त करा, असे साकडे राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना रविवारी घातले. 

महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाटील रविवारी पहिल्यांदाच सांगलीत आले होते. त्यांनी राष्ट्रवादीच्या विजयी आणि पराभूत उमेदवारांची बैठक घेतली. या बैठकीत पराभूत उमेदवारांनी कारण मिमांसा स्पष्ट केली. यावेळी अनेक पराभूत उमेदवारांनी नाराजांनी बंडखोरी केल्यानेच पराभव झाल्याच्या तक्रारी पाटील यांच्याकडे केल्या. त्याशिवाय मतदार सांगत असूनही पराभव झाल्याचे आश्‍चर्य वाटते, असेही मत काही उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केले. 

अनेक प्रभागातील नागरिकांनी भेटून भाजपच्या विजयाविषयी शंका व्यक्त केल्याचेही काहींनी यावेळी बैठकीत सांगितले. त्याशिवाय अपक्ष आणि बंडखोरांना प्रमाणाहून अधिक मतदान झाल्याने ईव्हीएम मशीनबाबतही अनेकांनी शंका व्यक्त केली. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी, असा सूरही पराभूत उमेदवारांमधून उमटल्याचे सूत्रांनी सांगितले. पराभूतांसह विजयी झालेल्या उमेदवारांनीही ईव्हीएमबाबत तक्रार केल्याने सोमवारी याबाबत निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचे आश्‍वासन जयंत पाटील यांनी यावेळी दिले. 

पराभव झाल्याचे समजून घरात बसलेले उमेदवार मताधिक्क्याने निवडून कसे आले, असा सवालही काहींनी यावेळी विचारला. त्याशिवाय ईव्हीएम मशीनची चाचणीसह अन्य मागण्या फेटाळल्याने आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या कार्यपद्धतीविषयीही नाराजी व्यक्त करण्यात आली. शिवाय ईव्हीएम मशीन सील करताना अधिकार्‍यांनी उमेदवारांना बाहेर का काढले, याचाही जाब विचारावा असाही मतप्रवाह यावेळी दिसून आला. यावेळी माजी महापौर इद्रिस नायकवडी, प्रा. पद्माकर जगदाळे, मैनुद्दीन बागवान, धनपाल खोत, राहुल पवार, विनया पाठक, कमलाकर पाटील आदी उपस्थित होते.