होमपेज › Sangli › सांगलीकरांचे विकासासाठी परिवर्तन; भ्रष्टाचाऱ्यांना लाथाडले

सांगलीकरांचे विकासासाठी परिवर्तन; भ्रष्टाचाऱ्यांना लाथाडले

Published On: Aug 03 2018 6:52PM | Last Updated: Aug 03 2018 6:51PM सांगली :  प्रतिनिधी

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आलटून पालटून सत्ता होती. यावेळी मात्र भाजपच्या रुपाने जनतेसमोर सक्षम पर्याय उपलब्ध झाल्याने भ्रष्ट काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सांगलीकरांनी पूर्णपणे लाथाडले. विकासाच्या अपेक्षेनेच जनतेने हे परिवर्तन केल्याचे दिसून येत आहे. 

सांगली जिल्हा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आतापर्यंत ओळखला जात होता. मात्र लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषदेत भाजपने विजय मिळवल्यानंतर महापालिकेत काय होणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. भाजपसमोर आपला ठिकाव लागणार नाही, हे लक्षात आल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महिनाभर सांगलीतच तळ मारला. 

काँग्रेसपेक्षा कमी जागा स्वीकारत त्यांनी  भाजप बरोबर लढत देण्यासाठी आघाडी केली. आघाडी असूनही राष्ट्रवादीचे सक्षम उमेदवार होते. तुलनेत काँग्रेसचे उमेदवार तेवढे सक्षम नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वाधिक उमेदवार, तर काँग्रेस दुसर्‍या क्रमांकावर आणि भाजप तिसर्‍या क्रमांकावर जाईल, असा अंदाज बहुतेक जाणकार  व्यक्त करीत होते. मात्र हा अंदाज जनतेने चुकीचा ठरवला. 

सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ आणि मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी गेल्या चार वर्षात आणलेला विकास निधी शहरात झालेल्या रस्त्यांच्या रुपाने दिसत होता. दुसर्‍या बाजूला काँग्रेसने केलेली निकृष्ट कामे जनतेने लक्षात ठेवल्याचे दिसत आहे. शहरात चांगली उद्याने नाहीत, भाजीमंडई अशा विविध पायाभूत सुविधांची वाणवा आहे. 

काँग्रेस- राष्ट्रवादीला उमेदवार ठरवताना दमछाक झाली. वर्षानुवर्षे महापालिकेत तळ मारलेले दिग्ज या दोन्ही पक्षाकडून मैदानात उतरले होते. मात्र जनतेने त्यांना पराभवाची धुळ चारली. सध्याच्या महापालिकेत अनेक नवखे उमेदवार निवडून आले आहेत. विकासासाठी जनतेने हे परिवर्तन केले आहे.