Sun, May 26, 2019 10:36होमपेज › Sangli › आघाडीला प्रभाग 9 मध्ये अपक्षांनी झुंजवले

आघाडीला प्रभाग 9 मध्ये अपक्षांनी झुंजवले

Published On: Aug 07 2018 1:01AM | Last Updated: Aug 06 2018 10:42PMसांगली : प्रतिनिधी

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा बालेकिल्ला समजला जाणार्‍या प्रभाग 9 मध्ये अपक्षांनी जोरदार टक्कर दिली. आघाडीला चांगलेच झुंजवले. भाजपनेही चांगली मते घेतली. महापालिका क्षेत्रात सर्वात कमी मतदान झालेल्या प्रभाग 17 मध्ये ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ चे होमपिच उखडले. भाजपने तीन जागा जिंकल्या. राष्ट्रवादीचे एकमेव उमेदवार माजी विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी कामाच्या जोरावर एकतर्फी विजय मिळविला. 

महापालिकेच्या प्रभाग क्रं. 9 ची लढत लक्षवेधी ठरली. सर्वांचे लक्ष या लढतीकडे होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विद्यमान नगरसेवक संतोष पाटील, रोहिणी पाटील, मणगू सरगर तसेच मदिना बारूदवाले यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसमधून अतुल माने, राष्ट्रवादीतून बंडू सरगर, वृषाली पाटील यांनी बंडखोरी करून आघाडीपुढे आव्हान निर्माण केले. वातावरण निर्मितीत अपक्षांनी आघाडी घेतली होती. मदनभाऊ गटाचे संतोष पाटील विरूध्द बंडखोर अतुल माने आणि राष्ट्रवादीचे मनगू सरगर विरूद्ध बंडखोर बंडू सरगर यांच्यात जोरदार लढत झाली. चार वेगवेगळी चिन्हे घेऊन अपक्षांनी शर्थींची झुंज दिली. मात्र संतोष पाटील, रोहिणी पाटील, मनगू सरगर, मदिना बारूदवाले हे आघाडीचे चारही उमेदवार विजयी झाले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने चारही जागा जिंकत बालेकिल्ला शाबूत ठेवला. संजयनगर, अभयनगर, हडको कॉलनी आदी परिसराने अपक्षांना साथ दिली. मात्र सह्याद्रीनगर, वसंत कॉलनी, सरस्वतीनगर भाग आघाडीच्या पाठिशी राहिला. भाजपचे श्रीकांत वाघमोडे, प्रियंका बंडगर, उषा गायकवाड, बाळाराम जाधव यांनीही चांगली मते घेतली. भाजपच्या महिला उमेदवार दुसर्‍या स्थानावर, तर भाजपचे पुरूष उमेदवार तिसर्‍या स्थानावर राहिले. 

प्रभाग क्रं. 17 हा सुशिक्षित व अन्य प्रभागांच्या तुलनेत विकासात पुढे असलेला भाग आहे. मात्र या प्रभागातच महापालिका क्षेत्रात सर्वात कमी 54.64 टक्के मतदान झाले. मतदानाचा टक्का घटल्याने याठिकाणी कोणाला फटका बसणार याकडे लक्ष लागले होते. मात्र निकाल बाहेर आला आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे ‘होमपीच’ उखडले. भाजपने नियोजनबध्द प्रचाराने चारपैकी तीन जागा जिंकल्या. लक्ष्मण नवलाई, गीता सुतार, गीतांजली सूर्यवंशी विजयी झाले. या प्रभागात राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी हे एकमेव उमेदवार विजयी झाले. प्रभाग 17 ड मध्ये अपक्षांनी 2 हजार 320 मते घेतली. काही नगरसेवकांविरोधातील नाराजी आघाडीला पिछाडीवर घेऊन गेली. पारिजात कॉलनी, दत्तनगर, विकास चौक ते शांतीसागर कॉलनी परिसर, धामणी रोड, कुंटे मळा, प्रगती कॉलनी, पार्श्‍वनाथ कॉलनी परिसराने भाजपला चांगली साथ दिली.