Thu, Apr 25, 2019 14:17होमपेज › Sangli › बंडखोरांमुळेच आघाडीचा पराभव

बंडखोरांमुळेच आघाडीचा पराभव

Published On: Aug 06 2018 1:55AM | Last Updated: Aug 05 2018 11:25PMसांगली : प्रतिनिधी

काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना 37 टक्के मते मिळाली आहेत. तर आघाडीतील बंडखोरांना दहा टक्के मते मिळाली आहेत. भाजपला 34 टक्के मते मिळाली आहेत. आघाडीचे उमेदवार आणि बंडखोरांच्या मतांची टक्केवारी 47 आहे. 66 टक्के मतदारांनी भाजपला नाकारले आहे. बंडखोरांनी अधिक मते घेतल्याने महापालिका निवडणुकीत आघाडीचा पराभव झाल्याची कबुली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पाटील म्हणाले, भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आयात केलेले उमेदवार दिले होते. काँग्रेसमधून सहा तर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या पाचजणांना उमेदवारी दिली होती. सध्या निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेवकांमध्ये फक्‍त सहा नगरसेवक मूळचे भाजपचे आहेत. अन्य सर्व नगरसेवक त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आयात केलेले आहेत. आघाडीने डावललेल्यांना त्यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी दिली, असा आरोपही पाटील यांनी यावेळी केला. 

सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात आघाडीला बहुमत मिळेल असेच वातावरण होते. तरीही आघाडीचा झालेला पराभव इथल्या जनतेला मान्य नाही. पोस्टल मतातून निकालाचा कल समोर येत असतो. सर्वच प्रभागात सर्वाधिक पोस्टल मते आघाडीच्या उमेदवारांना मिळाली आहेत. पोस्टाने मतदान करणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी असतात. ते कोणत्याही आमिष, दबावाला बळी न पडता मतदान करतात. त्यामुळे त्या मतांवरून निकालाचा कल स्पष्ट झालेला असतानाही आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचे आश्‍चर्य वाटते असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. 

सांगलीतील विश्रामबागमध्ये काँग्रेसचे एक नेते रहातात. त्यांच्या घरात 43 मते आहेत. मात्र त्यांच्या घर असलेल्या बुथवर आघाडीच्या उमेदवारांना केवळ 35 मते मिळाली आहेत. हे कसे शक्य झाले याचे उत्तर मिळत नाही. त्याशिवाय आघाडीने उमेदवारी देताना निवडून येणार्‍यांना उमेदवारी दिली होती. ज्या बंडखोरांनी निवडणूक लढवली त्यांना पाचशे मतेही मिळणार नव्हती असे आमच्या सर्वेत स्पष्ट झाले होते. तरीही त्या उमेदवारांना दीड ते दोन हजार मते कशी मिळाली हा संशोधनाचा विषय आहे असेही पाटील यावेळी म्हणाले.

भाजपने जाहीर केलेला जाहीरनामा अंमलात आणून तीनही शहरांचा विकास करावा. आघाडीचे नगरसेवक आमच्या जाहीरनाम्यानुसार विकासाची कामे करतील. आघाडीच्या नगरसेवकांच्या केंद्रस्थानी केवळ विकासाचा आग्रह असेल. उणीवा भरून काढून संघटन मजबूत करू. सत्ताधारी भाजपने कुपवाडमधील ड्रेनेजच्या कामाला गती द्यावी. विरोधासाठी विरोध केला जाणार नाही. विकासाकामांना पाठींबा दिला जाईल.  असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. 

यावेळी आघाडीच्या पराभूत उमेदवार प्रियांका बंडगर म्हणाल्या, माझ्याविरोधातील जो उमेदवार निवडून आला आहे त्याच्या विजयी मिरवणुकीत केवळ सात लोक होते. साडेचार हजार मते पडणार्‍या उमेदवाराच्या मिरवणुकीत इतके कमी लोक कसे असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. मिरजेतील एका प्रभागातील भाजपच्या उमेदवाराने मतदान संपल्यानंतरच फटाक्यांची आतषबाजी केली होती. प्रभाग 12 मध्ये प्रभागाबाहेरील उमेदवार असूनही तो मताधिक्याने कसा निवडून आला असा प्रश्‍न सोमनाथ सूर्यवंशी यांनी उपस्थित केला.