होमपेज › Sangli › प्रशासनाच्या प्रभागरचनेत गंभीर त्रुटी

प्रशासनाच्या प्रभागरचनेत गंभीर त्रुटी

Published On: Mar 10 2018 2:07AM | Last Updated: Mar 10 2018 12:18AMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेत गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. यामध्ये प्रभाग जोडताना गणांची मतदारसंख्या, हद्दी आदींमध्ये गोंधळ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने प्रशासनाची झाडाझडती घेत दुरुस्ती सुरू केली आहे. यासाठी आयुक्त, उपायुक्तांसह अधिकार्‍यांना मुंबईला पाचारण केल्याची चर्चा आहे. त्यानुसार दुरुस्ती सुरू असून, मंगळवारी निवडणूक आयोग त्याला अंतिम स्वरूप देणार आहे. 

महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक जुलैमध्ये होणार आहे. यानुसार निवडणूक आयोगाने चार सदस्यांचे प्रभाग करण्याचे आदेश दिले आहेत. जेथे प्रभागरचनेची अडचण असेल तेथे तीन अथवा पाच सदस्यांचे दोन प्रभाग करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाच्या होत्या. त्यासाठी पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व आयुक्तांची समिती नेमली होती. त्यानुसार महापालिकेला दि. 17 फेबु्रवारीपर्यंत प्रभाग रचना व मागासवर्गीयांची संख्या निश्‍चित करून आराखडा दि. 3 मार्चला राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्याची मुदत होती. 

आयुक्त खेबुडकर व त्यांच्या टीमने दि. 1 मार्चला प्रभाग रचना व अनुसूचित जाती, जमाती सदस्यांचे प्रभाग अंतिम केले. जिल्हाधिकारी व पुणे विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने तो आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला होता. प्रशासनाने त्या प्रभाग रचनेत 78 नगरसेवकांचा समावेश केला आहे. त्यासाठी प्रशासनाने वीस प्रभाग केले आहेत. त्यामध्ये 18 प्रभाग हे चार सदस्यांचे आहेत. तर उर्वरित दोन प्रभाग तीन सदस्यांचे केल्याची चर्चा आहे. मात्र ही प्रभाग रचना करताना मतदार संख्या असलेले बूथ, गण जुळविताना लोकसंख्येचा विचार झाला नाही. त्यामुळे अनेक प्रभाग 20 हजारांच्या आतील झाले आहेत. तर काही प्रभाग 20 ते 27 हजारांपर्यंत गेले आहेत. 

प्रभाग करताना मतदारसंख्येत जास्ती फरक होता कामा नये, असा निवडणूक आयोगाचा निकष आहे. यासह प्रभागाच्या हद्दी जोडतानाही कमी-जास्त प्रमाण झाले आहे. या अशा अनेक चुकींमुळे पुन्हा हरकती-तक्रारी होण्याची शक्यता आहे.

या सर्वाचा निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांनी पंचनामा केला. या त्रुटी सुधारण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांनी बदल सुरू केला. 
त्यासाठी मनपा आयुक्त, उपायुक्त व दोन प्रमुख अधिकारी दोन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून बसले असल्याची चर्चा महापालिकेत सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोग मंगळवारी दि. 13 रोजी प्रारूप प्रभाग रचनेला अंतिम मान्यता देणार आहे. 

त्यानंतर दि. 20 मार्चला प्रभाग रचना जाहीर होणार असून त्याच दिवशी ओबीसी व महिलांची आरक्षण सोडत होणार आहे.