Fri, Jul 19, 2019 05:05होमपेज › Sangli › प्रभागरचना, आरक्षण सोडत मंगळवारी

प्रभागरचना, आरक्षण सोडत मंगळवारी

Published On: Mar 17 2018 1:13AM | Last Updated: Mar 16 2018 8:57PMसांगली : प्रतिनिधी

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशने महापालिका निवडणुकी-साठीची प्रारूप प्रभागरचना मंगळवारी (दि. 20) खुली होणार आहे. यासोबत प्रभागांची आरक्षण सोडतही त्याच दिवशी सांगलीतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी झाली आहे. 

यामुळे या ड्रॉतून कोणाचे प्रभाग टिकणार, प्रभाग कोठेपर्यंत पसरले आहेत या काळजीने सर्वच पक्षांच्या विद्यमान नगरसेवक तसेच इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. यातून कोणासाठी प्रभाग सोयीस्कर, कोणा विद्यमान व इच्छुकांच्या आरक्षणातून दांड्या गुल होणार ते स्पष्ट होणार आहे.

पहिल्यांदाच चार सदस्यीय पॅनेलद्वारे निवडणूक होत आहे. त्यासाठी प्रशासनाने प्रारूप प्रभागरचना आणि मागासवर्गीय प्रभागही निश्‍चित केले होते. त्यावर निवडणूक आयोगाने नुकताच शिक्कामोर्तब केला. आता आरक्षण सोडत व प्रभागरचना मंगळवारी खुली होईल. त्यानुसार ती शासनाच्या अधिसूचना राजपत्रात 23 रोजी जाहीर होईल. त्यावर सूचना हरकतीसाठी 23 मार्च ते 3 एप्रिल रोजी दुपारी 3 पर्यंत मुदत आहे. या कालावधीत  आयुक्‍तांचे निवडणूक कार्यालय, मुख्यालयात बारनिशी, मिरज व कुपवाड प्रभाग कार्यालयात सूचना, हरकती स्वीकारल्या जातील, असे आयुक्‍त रविंद्र खेबुडकर यांनी सांगितले. सुनावणीबाबत नागरिकांना स्वतंत्रपणे कळविले जाईल.

पक्षीय उमेदवारी, फोडाफोडीला येणार वेग

निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी आघाडी, महापालिका संघर्ष समिती, सांगली जिल्हा सुधार समितीसह अनेक पक्ष इच्छुक आहेत. परंतु प्रभागरचना, प्रभागाचे आरक्षण खुले झाल्यानंतर खर्‍या अर्थाने उमेदवारी कोणाला, कोण बंडखोरी करणार, ते स्पष्ट होईल. यासोबतच अन्य पक्षांतून फोडाफोडीचे राजकारण गतिमान होणार आहे.