होमपेज › Sangli › गाडगीळ, जयश्रीताईंच्या घरांवर उद्या मोर्चा

गाडगीळ, जयश्रीताईंच्या घरांवर उद्या मोर्चा

Published On: Mar 17 2018 1:13AM | Last Updated: Mar 16 2018 9:25PMसांगली : प्रतिनिधी

एलबीटीच्या थकबाकीसाठी करनिर्धारण आणि  वसुलीच्या नावे महापालिकेने नाहक त्रास सुरू ठेवला आहे. तो थांबवावा. याबाबत आमदार सुधीर गाडगीळ आणि काँग्रेसनेत्या जयश्रीताई पाटील यांनी भूमिका जाहीर कराव्यात. या मागणीसाठी रविवारी ((दि. 18) त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्धार व्यापारी एकता असोसिएशनने शनिवारी आयोजित मेळाव्यात जाहीर केला. 

जोपर्यंत  त्यांची भूमिका जाहीर होत नाही, तोपर्यंत  धरणे आंदोलनाची गुढी उभारणार असल्याचे अध्यक्ष समीर शहा यांनी सांगितले.  निर्णय जाहीर झाला नाही, तर त्यांचा नकार समजून आम्ही आंदोलनाची आगामी भूमिका ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनाला शिवसेना नेते नगरसेवक शेखर माने, उपमहापौर विजय घाडगे, जिल्हा सुधार समितीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. अमित शिंदे यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी मेळाव्यास उपस्थित राहून पाठिंबा जाहीर केला.

शहा म्हणाले, एलबीटी हटूनही दोन वर्षे असेसमेंटच्या  नावे व्यापार्‍यांना प्रशासन ब्लॅकमेल करीत आहे. आम्ही यासंदर्भात आमदार गाडगीळ यांना कर निर्धारण कशा पद्धतीने जाचक आहेत हे पटवून सांगितले. पण शासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे निर्धारण रद्दसाठी लढा सुरूच ठेवला आहे.

ते म्हणाले, पण महापालिकेने आता एकतर्फी निर्धारण करून ज्यांची वार्षिक 10 लाखांची उलाढाल आहे, अशा व्यापार्‍यांना कोट्यवधी रुपयांच्या मागणी नोटिसा बजावल्या. त्यासाठी जप्तीच्याही धमक्या दिल्या आहेत. वास्तविक यासंदर्भात  आमदार गाडगीळ यांनी प्रयत्न केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईस स्थगितीही जाहीर केली. परंतु तीन महिने झाले तरी लेखी आदेश आले नाहीत. महापालिकेची अधिकारी त्याचे लेखी आदेश नाहीत असे सांगत कारवाई करीत आहेत. याबाबत महापौर, आयुक्‍तांसह कोणीही लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाहीत. मात्र एलबीटी अधीक्षक तर निर्धारण कायदेशीर असल्याचे सांगून वाद पेटवत आहेत.

 ते म्हणाले, यामुळे आता व्यापार्‍यांना या त्रासाविरोधात आंदोलनाची भूमिका जाहीर करण्याची वेळ आली आहे. यासाठीच गुढीपाडव्यालाच व्यापार्‍यांची  मोटारसायकल रॅली काढण्यात येईल. श्री. गाडगीळ आणि श्रीमती जयश्री पाटील यांच्या घरासमोर निर्णयासाठी धरणे धरू. यावेळी सुरेश पटेल, सोनेश बाफना, मुकेश चावला, सुदर्शन माने, धीरेन शहा  उपस्थित होते.

मदनभाऊ असते तर प्रश्‍नच शिल्लक राहिला नसता!

समीर शहा म्हणाले, एलबीटीच्या वादाबाबत काँग्रेसनेते (कै.) मदन पाटील यांनी मध्यस्थी केली होती. स्वयंनिर्धारणाद्वारे कर भरण्याचा तोडगा काढला होता. त्यानुसार आम्ही करभरणाही केला. ज्यांनी स्वयंनिर्धारणाद्वारे करभरणा केला त्यांना पुन्हा त्रास देणार नाही, असे त्यांनी वचन दिले होते.  पण त्यांच्या पश्‍चात कर भरलेल्यांनाही नाहक त्रास दिला जात आहे. ते असते तर हा प्रश्‍नच शिल्लक राहिला नसता. किमान त्यांच्या अनुयायांनी तरी याबाबत दखल घ्यावी.