Fri, Apr 26, 2019 17:28होमपेज › Sangli › निवडणूक आयोगाकडून आयुक्तांची चौकशी

निवडणूक आयोगाकडून आयुक्तांची चौकशी

Published On: Jun 02 2018 2:03AM | Last Updated: Jun 01 2018 11:11PMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर भाजपधार्जिणे असून, पक्षपातीपणे कारभार करीत असल्याची  तक्रार महापौर हारुण शिकलगार यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. 

महापौर शिकलगार यांनी दोन आठवड्यांपूर्वी खेबुडकर यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. आगामी निवडणुकीत आयुक्त खेबूडकर निवडणूक अधिकारी नकोत, असेही म्हटले होते. त्या तक्रारीचे स्वरुप असे ः खेबूडकर यांनी निवडणूक आयोगाचा सन 1969 चा आदेश दाखवून निवडणुकीपूर्वीच तीन महिने आधी विकासकामे प्रलंबित ठेवण्याचे आदेश मनपाच्या खातेप्रमुखांना दिले आहेत. मात्र, हे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला नाहीत. त्यामुळे महापालिका क्षेत्रात नगरसेवकांची कामे ठप्प झाली आहेत. तर मंत्री, राज्यमंत्री, आमदार व खासदारांना काम करण्यास मुभा मिळत आहे.  आयुक्तांनी हा पक्षपातीपणा केला आहे. 

पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता संपूनही खेबुडकर यांनी लेखी आदेशासाठी पदाधिकार्‍यांची वाहने अडविली होती. आयुक्तांनी अनेक कामात अधिकाराचा गैरवापर केला आहे. त्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यामुळे ही निवडणूक आयुक्तांच्या अधिपत्याखाली घेऊ नयेत.

 आयोगाने जिल्हाधिकारी पाटील यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दोन दिवसांपीर्वी महापौरांसह काही अधिकार्‍यांची भेट घेऊन आयुक्तांबद्दलच्या आक्षेपांची माहिती घेतल्याचे समजते. 

महापौरांबरोबर आयुक्तांचेही म्हणणे घेतले
महापौर शिकलगार म्हणाले,  जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने त्यांच्या एका पथकाने माझ्याकडे येऊन चौकशी केली. त्यांना पुरावे दिले आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या अहवालानुसार योग्य ती कार्यवाही होईल.
आयुक्त खेबुडकर म्हणाले, जिल्हाधिकार्‍यांच्या समितीने माझ्याकडेही तक्रारीबाबत चौकशी केली . मी योग्य ती वस्तुस्थिती मांडली आहे.