सांगली ः प्रतिनिधी
शामरावनगरला दुरवस्थेत ठेवण्याचे पाप महापालिकेतील सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादीसह निष्क्रीय नगरसेवकांनीच केले आहे, असा आरोप भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस शरद नलावडे आणि रज्जाक नाईक यांनी पत्रकार बैठकीत केला.
ते म्हणाले, शामरावनगरात आमदार सुधीर गाडगीळ यांच्या पाठपुराव्यामुळे मुरुमीकरण सुरू आहे. जिथे महापालिकेला अडचण आहे, तिथे आमदार स्व:खर्चाने मुरुमीकरण करीत आहेत. पण महासभेत राजकीय स्टंटबाजीचे खोटे आरोप करीत काँग्रेस-राष्ट्रवादीकडून घाणेरडे राजकारण सुरू आहे. आमदारांनी मुरुम टाकला, तुम्ही इतकी वर्षे काय केले, असा जाबही त्यांनी विचारला.
शामरावनगरातील मुरुमीकरणाचे राजकारण चांगलेच पेटले आहे. महापालिकेचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला. त्यातून मुरुमीकरण सुरू असताना भाजपने गाड्यांना झेंडे लावून जाहिरातबाजी केली असा आरोप गुरुवारी महासभेत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला होता. त्याचा नलाववडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी समाचार घेतला.
ते म्हणाले, आम्ही आमदार गाडगीळ यांच्या माध्यमातून नगरविकास खात्याकडून 4.27 कोटी रुपयांची कामे पाठपुरावा करून वर्षभरापूर्वी मंजूर केली. यामध्ये 15 कामांतून 22 ते 24 गल्ल्यांतील रस्ते डांबरीकरण होणार आहे. पण महापालिकेने ड्रेनेजची खोदाई केल्याने ही कामे अडली आहेत. त्या चरी वेळेत मुजवण्याची जबाबदारी असताना नगरसेवक, पदाधिकार्यांसह प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळेच रस्त्यांची कामे लांबली. आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांची कामे होत आहेत. त्यामुळे ड्रेनेजच्या चरींची कामे त्यांच ठेकेदारांकडून झाल्यास एकसमान काम होईल यासाठीच स्थायी समिती, महापौरांच्या सुचनेनुसार निधी वर्ग करण्यात आला. ते म्हणाले,ही कामे सुरू होणार असल्यानेच सर्वपक्षीय समितीने जिल्हाधिकारी, आयुक्त आणि आमदार गडगीळ यांना भेटून तक्रारी मांडल्या. त्यानुसारच आमदारांनी त्या भागात जाऊन दुरवस्थेचा पंचनामा सुरू केला. नलावडे म्हणाले, शामरावनगरमधील नागरिकांचे हाल पाहून श्री. गाडगीळ यांनी तत्काळ लागेल तेवढा मुरुम टाकण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर ज्या 22 ते 24 रस्त्यांचा या कामांमध्ये समावेश नाही, तेथे नागरिकांच्या सोयीसाठी ते पदरमोड करून मुरुम टाकत आहेत. त्याच गाड्यांना भाजपचे झेंडे लावले आहेत. भाजपचे कार्यकर्ते दिवसभर यासाठी राबत आहेत. पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवक, पदाधिकारी तिकडे फिरकले नाहीत. ते म्हणाले,सांगलीचे नागरिकांना आमदार गाडगीळ यांनी केलेल्या कामांची माहिती आहे. जाणीव आहे. मात्र नगरसेवकांना फिरकू देणार नाही असेही नागरिकांनीच सुनावले आहे. त्यामुळेच उद्विग्न होऊन महासभेत बेताल आरोप करीत पुन्हा कामे अडविण्याचा उद्योग सुरू झाला आहे. शामरावनगरचा मुख्य रस्ता पदाधिकारी, प्रशासनाने अडविला आहे. झालेले काम निकृष्ट झाले आहे. त्यामुळे आम्हाला अंतर्गत मुरुमीकरणास अडचण येत आहे. या रस्त्यांच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची शासनाकडे मागणी करू.
कामे झाली की आयुक्त तुमचे; न झाल्यास आमचे?
नलावडे म्हणाले, आयुक्त भाजपधार्जिणे आहेत.त्यांच्या माध्यमातून भाजप कामे अडवित असल्याच्या काँगेस, राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय नगरसेवक वल्गना करीत आहेत. परंतु काँग्रेसनेच शहरात 200 कोटी रुपयांची रस्तेकामे, उद्याने झाल्याचे जाहीर केले आहे. यासाठी विविध योजनांतून शासनाकडूनच निधी आला आहे. आयुक्तांनीच त्यासाठी प्रयत्न केले, कामे मंजूर केली. करूनही घेतली. त्यावेळी आयुक्त तुमचे, न झाल्यास भाजपचे हा अजब न्याय आहे.