Tue, Jul 23, 2019 17:33होमपेज › Sangli › मिरज पॅटर्न आता सांगली, कुपवाडमध्येही

मिरज पॅटर्न आता सांगली, कुपवाडमध्येही

Published On: Feb 04 2018 10:56PM | Last Updated: Feb 04 2018 10:52PMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेत नेहमीच सत्तेचा खेळ मांडणार्‍या ‘मिरज पॅटर्न’ने पुन्हा आगामी निवडणुकीतही रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. यावेळी मात्र निव्वळ मिरजेपुरते कार्यक्षेत्र न ठेवता सांगली, कुपवाडमध्येही हात-पाय पसरण्यासाठी आडाखे सुरू केले आहेत. त्यासाठी मिरज संघर्ष समितीऐवजी महापालिका संघर्ष समितीची नोंदणी केली आहे. या आधारे पुन्हा त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास ‘सत्ता तिकडे चांगभले’ करीत सत्तेच्या खेळात ‘वजीर’ ठरण्याची स्वप्ने रगंविली आहेत.

सांगली, मिरज आणि कुपवाड अशा तीन शहरांची महापालिका असली तरी सत्तेत नेहमीच मिरजकर आणि मिरज पॅटर्न वरचढ ठरला आहे. 

सत्ता कोणाचीही असो, आमच्याशिवाय ‘गोल’ पूर्ण नाही, अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली आहे.  त्यासाठी कधी थेट काँग्रेस, राष्ट्रवादी, तर कधी महाआघाडी असेही प्रयोग झाले. माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी मिरज संघर्ष समितीच्या नोंदणीलाच महाआघाडीचे स्वरूप देत महाआघाडीचा खेळ रंगविला होता.   यात नायकवडी, सुरेश आवटी, मैनुद्दीन बागवान आदींचाही सहभाग होताच. काँग्रेसमधून नेहमीच गटाची कमांड सांभाळणारे किशोर जामदारही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जोडीला होते.

परंतु नेहमीच सत्तेत नेत्यांना ‘खिंडीत’ पकडून पदे आणि निधी पळविण्याचा त्यांचा हातखंडा मिरज पॅटर्न म्हणून चर्चेत राहिला आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येक निवडणुकीत मिरजेबाबत उमेदवारीचे आणि कामांचे जे ठरवायचे ते आम्हीच ठरवू असाच पवित्रा राहिला आहे. त्यामुळे नेते कै. मदन पाटील असोत वा राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी याचा अनुभव घेतला आहे. 

दरम्यान, महाआघाडीनंतर सध्याच्या टर्ममध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये जावून नायकवडींनी सत्तेत सहभाग घेतला आहे. मात्र तेथेही मनासारखे न झाल्याने त्यांनी प्रभाग समिती, सभापती निवडीत राष्ट्रवादीला हाताशी धरून सत्ताधारी काँग्रेसला झटके दिले होते. आता तर नायकवडींसह सुरेश आवटीही महापौरपद न मिळाल्याने नाराज आहेत. त्यामुळे पुन्हा त्यांनी राष्ट्रवादी तर कधी भाजपशी मिळते-जुळते घेण्याच्या हालचाली सुरू ठेवल्या. पण तेथेही म्हणावे तसे यश मिळेल याची खात्री नाही.

त्यामुळे आता पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपही नको, असा मिरज पॅटर्नमधील काहींनी सूर काढला आहे. त्यात नायकवडी हे आघाडीवर आहेत. त्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा संघर्ष समितीचे  हत्यार उपसले आहे. यासाठी आता केवळ मिरजेपुरते न राहता तीनही शहरातील काँग्रेस-राष्ट्रवादीतील नाराजांना जवळ करण्याच्या हालचाली सुरू आहेत. आता महापालिका संघर्ष समितीच्या नावे निवडणुकीसाठी पक्षनोंदणी करून त्यावर नायकवडींनी शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे आता मिरज पॅटर्न मिरजेत चालला तरी सांगली, कुपवाडमध्ये कितपत चालतो, अन्य पक्षांना कसे यश मिळते, यावर त्यांचा सत्तेचा खेळ रंगणार आहे.