Fri, Sep 20, 2019 07:34होमपेज › Sangli › सांगली : हरिपूर येथील स्वयंभू मार्कंडेश्वर 

सांगली : हरिपूर येथील स्वयंभू मार्कंडेश्वर 

Published On: Aug 22 2019 11:07AM | Last Updated: Aug 22 2019 11:09AM
सांगली :  सचिन सुतार 

कृष्णानदी आणि वारणा नदीच्या पवित्र संगमावर हरिपूर गाव वसले आहे. सांगलीपासून अवघ्या दोन किलोमीटरवर असणारे हरिपूर गाव  आहे. प्राचीन संगमेश्वर मंदिरामुळे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्द आहे. येथे प्रत्येक श्रावण सोमवारी मोठी यात्रा भरते.  

संगमेश्वराचा इतिहास 

संगमेश्वराचा इतिहास थेट रामायणाशी जोडला आहे. वनवासात असताना शिवभक्त प्रभू श्रीरामाने वाळूपासून हे शिवलिंग तयार करून पूजा केली असल्याची आख्यायिका जाणकारांकडून सांगितली जाते. मंदिराचे बंधाकाम हेमाडपंथी असून खांबांचा अर्धा भाग कोरीव असून अर्धा भाग गोलाकार चकत्यांनी बनला आहे. या चकतीवर आघात केला असता घंटेसारखा आवाज येतो. भिंतीवर गणेशमूर्ती कोरल्या आहेत. देवाच्या आंघोळीच्या पाण्याचे रांजण असून मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग रुपात मूर्ती आहे. त्यावर दुधाचा अभिषेक केल्यास दहा बोटांचे ठसे स्पष्टपणे दिसतात. बाजूची साळुका आणि लिंग यात बोटभर अंतर असून खाली वाळू व पाणी आहे. हे लिंग वाळूचे असूनही ते झिजत नाही, हे त्‍याचे वैशिष्‍ट्‍य. 

'श्रीगुरुचरित्रा'त या तीर्थक्षेत्रचा  'वरुणा संगम असे बरवे तेथे तुम्ही स्नान करा मार्कंडेय नावे संगमेश्वर पुजावा' असा उल्लेख आहे. श्रीक्षेत्र काशी नंतर हरिपूर येथेच स्वयंभू मार्कंडेश्वर आहे. 

श्री संगमेश्वर हे हरिपूरचे ग्रामदैवत आहे. वर्षातून तीनवेळा यात्रा भरते. श्रावण सोमवार, महाशिवरात्री आणि पौष पौर्णिमाला भरणारी विशाळी यात्रा, यावेळी संपूर्ण पंचक्रोशीतील शिवभक्त मोठी गर्दी करतात. विशाळी यात्रेदिवशी निघणाऱ्या पालखीवर गुलाल खोबऱ्याची उधळण केली जाते.  मंदिराच्या आवारात गणपती, हनुमान, कृष्णामाई आणि विष्णू मंदिर असे शिवपंचायतन आहे. 

शहरापासून जवळ असूनही गावाचे गावपण जपले आहे.  गावाच्या प्रवेशद्वारावरच भलीमोठी कमान आणि हनुमान मंदिर लक्ष वेधून घेते. मंदिराची दगडी तटबंदी, कोरीव विस्तीर्ण नदीघाट पाहण्यासारखे आहे. येथील जगप्रसिध्द हळदीची पेवे आणि नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या संगीत शारदा नाटक लिहिलेला वृक्ष पार अशी अनेक ठिकाणे आहेत.

हरिपूर येथील मार्कंडेश्वर  मंदिराकडे जाण्‍याचा मार्ग 

सांगली  येथील मुख्य बसस्थानकापासून अवघ्या २ किलोमीटरवर हरिपूर गाव आहे. स्थानकाशेजारील शास्त्री चौकातून खासगी वाहने, रिक्षा आणि विशेष म्हणजे टांग्याचीही सोय आहे. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex