Fri, Apr 19, 2019 08:09होमपेज › Sangli › गळवेवाडी बालिका खून प्रकरणी डीएनएसाठी नमुने पाठविले

गळवेवाडी बालिका खून प्रकरणी डीएनएसाठी नमुने पाठविले

Published On: Jan 11 2018 1:08AM | Last Updated: Jan 10 2018 10:48PM

बुकमार्क करा
सांगली/आटपाडी : प्रतिनिधी

गळवेवाडी (ता. आटपाडी) येथील प्रतीक्षा गळवेच्या खूनप्रकरणी पोलिसांचा युद्धपातळीवर तपास सुरू आहे. दरम्यान, डीएनए चाचणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांना अद्याप कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत. दरम्यान, बुधवारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. 
रविवारी सायंकाळी गायब झालेल्या प्रतीक्षाचा सोमवारी सकाळी पडक्या विहिरीत मृतदेह सापडला होता. त्यानंतर नातेवाइकांनी तिच्यावर अत्याचार करून खून केल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला आहे. दरम्यान, पोलिसांनी अत्याचाराबाबतचा अहवाल येणार असल्याचे सांगितले. 

सोमवारपासून पोलिसांनी गळवेवाडी व काळेल वस्तीवर तपास सुरू ठेवला आहे. मात्र पोलिसांच्या हाती अद्यापपर्यंत ठोस धागेदोरे हाती लागलेले नाहीत. 

दरम्यान काहीजणांवर पोलिसांना संशय असल्याने त्यांच्या शोधासाठी विविध भागात पोलिसांची पथके पाठविण्यात आली आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी अमरसिंह निंबाळकर,पोलिस निरिक्षक आप्पासाहेब कोळी यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक या प्रकरणाचा कसून तपास करीत आहे.