Thu, Aug 22, 2019 12:30होमपेज › Sangli › आता मिशन ‘कचरा वर्गीकरण’

आता मिशन ‘कचरा वर्गीकरण’

Published On: Mar 13 2018 11:04PM | Last Updated: Mar 13 2018 11:04PMसांगली : प्रतिनिधी

स्वच्छ सर्वेक्षण अभियाना-पाठोपाठ आता स्वच्छतेच्या अंमलबजावणीसाठी व्यापक मोहीम देण्यात येणार आहे. यातून शहरात कचरा वर्गीकरणाचे मिशनच चालविण्यात येणार असल्याचे आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांनी सांगितले. यासाठी शहरातील 1100 अपार्टमेंटस्, 5 हजारावर व्यावसायिकांना आरोग्य विभाग धडे देणार आहे, असे ते म्हणाले. 

खेबुडकर म्हणाले, आठवडाभरात 50 आरोग्य कर्मचारी आणि स्वच्छता निरीक्षक हे मिशन फत्ते करतील. त्यानुसार त्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू होईल. याद्वारे घनकचरा प्रकल्पातील ओला, सुका कचरा वर्गीकरणाचा पहिला टप्पा ठरेल.

ते म्हणाले, स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्व्हेमध्ये महापालिकेने सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात बाजी मारण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी राज्य व केंद्राच्या समितीने सर्व्हे केला आहे. त्याचा निकाल लागण्यास विलंब लागणार आहे. परंतु, सर्वेक्षणानंतर कचरामुक्‍तीची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यासंदर्भात शहरातील स्वच्छता निरीक्षकांची नुकतीच बैठक घेतली. 

खेबुडकर म्हणाले, यामध्ये शहरात कचरा वर्गीकरण आणि नियोजनाचा आराखडा करण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने 1100 निवासी अपार्टमेंटमध्ये तसेच 5 हजार व्यावसायिकांना कचरा वर्गीकरण, त्यामधील घटकांनुसार सुका, ओला कचरा व त्यातून साठवणची पद्धत याचे धडे दिले जातील. यासाठी दररोज 50 कर्मचारी या अपार्टमेटमध्ये जाऊन रोज किमान 4 ठिकाणी जागृतीपर बैठका घेतील. त्याद्वारे रोज 200 अशाप्रमाणे आठवड्यात या बैठका होतील. त्यानुसार कचरा वर्गीकरणाची आठवड्याभरात सुरुवातही होईल. 

ते म्हणाले, व्यावसायिकांचा सुका व प्लास्टिकसह सर्वच कचरा रात्रीच संकलित करण्यात येणार आहे. त्याची मिरजेत सुरुवात केली. सात घंटागाड्यांद्वारे रोज चार टन कचरा गोळा केला जात आहे. सांगलीतही अशाच पद्धतीने लवकरच घंटागाड्या खरेदी करून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. हा घनकचरा प्रकल्पासंदर्भात हरित न्यायालयाच्या आदेशाने सुरू असलेल्या अंमलबजावणीचाच भाग आहे.