Fri, Apr 26, 2019 02:10होमपेज › Sangli › पाटील की गायकवाड.. आज फैसला

पाटील की गायकवाड.. आज फैसला

Published On: Jan 11 2018 1:08AM | Last Updated: Jan 10 2018 10:44PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी मदनभाऊ गटाचे दिनकर पाटील व वसंतराव गायकवाड यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. माजीमंत्री अजितराव घोरपडे गटाचे जीवन पाटील व दीपक शिंदे शर्यतीत आहेत. उपसभापतिपदी कवठेमहांकाळचे अजित बनसोडे यांची निवड निश्‍चित मानली जात आहे. सभापती, उपसभापती निवड गुरूवारी होणार आहे. 

बाजार समिती सभापती, उपसभापती निवडीसाठी गुरूवारी सकाळी 11 वाजता संचालक मंडळाची विशेष सभा होणार आहे. प्रांताधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.  सभापती, उपसभापती निवडीच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. कदम गट, मदनभाऊ गट, घोरपडे गट, विशाल पाटील गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना असे सर्व गट-तटाचे संचालक एकत्रितपणे सहलीवर आहेत.

डॉ. कदम यांचा ‘मेसेज’ आज सभापती, उपसभापतीपदाच्या शर्यतीत अनेक संचालक आहेत. इच्छुकांनी राजकीय फिल्डींग जोरात लावली आहे. सभापतीपदी आपलीच निवड होणार असा विश्‍वास इच्छुकांमध्ये आहे. सभापती, उपसभापती निवडीच्या अनुषंगाने बुधवारी रात्री नेत्यांची चर्चा होणार आहे. सभापती, उपसभापतीपदाच्या उमेदवारांचे नाव डॉ. कदम यांच्याकडून गुरूवारी सकाळी दहा वाजता येईल. तोपर्यंत सभापतीपदाच्या नावाबाबत सस्पेन्स कायम ठेवला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

बाजार समितीत डॉ. पतंगराव कदम गट आणि मदनभाऊ गट यांच्यात मोठे सख्य आहे. हे दोन्ही गट आता गट न मानता डॉ. कदम व जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. त्यांच्याकडे पुरेसे बहुमतही आहे. सभापतीपद मिरज तालुक्याला मिळणार असल्याचे सत्ताधारी नेत्यांनी स्पष्ट केले आहे. मदनभाऊ गटाचे दिनकर पाटील व वसंतराव गायकवाड यांच्यात मोठी रस्सीखेच आहे. घोरपडे गटाचे जीवन पाटील, दीपक शिंदे, विशाल पाटील गटाचे अण्णासाहेब कोरे, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कुमार पाटील हेही इच्छुकांच्या यादीत आहेत. मात्र खरी चुरस दिनकर पाटील व वसंतराव गायकवाड यांच्यातच आहे. उपसभापतीपदी रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथील अजित बनसोडे यांची निवड निश्‍चित मानली जात आहे. बनसोडे हे डॉ. कदम गटाचे आहेत.