Thu, Aug 22, 2019 12:55होमपेज › Sangli › कोथळे खून प्रकरण : आज दोषारोपत्र दाखल होणार

कोथळे खून प्रकरण : आज दोषारोपत्र दाखल होणार

Published On: Feb 04 2018 10:56PM | Last Updated: Feb 04 2018 10:56PMसांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळेच्या खूनप्रकरणी संशयित बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह संशयितांविरोधात सोमवारी (दि. 5) दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.  त्यावर सुनावणी कधीपासून सुरू होईल. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम कधी येणार याचीही लोकांना उत्सुकता आहे. 

अनिकेतचा खून 6 नोव्हेंबरला रात्री करण्यात आला होता. दि. 7 रोजी कावळेसाद येथे त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. मंगळवारी या घटनेला तीन महिने पूर्ण होत आहेत. त्यामुळे त्यापूर्वी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी सीआयडीच्या अधिकार्‍यांची तयारी पूर्ण झाली आहे. याप्रकरणी यापूर्वीच पोलिस उपनिरीक्षक युवराज  कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे,    नसरुद्दीन मुल्ला, गाडीचालक राहुल शिंगटे, झीरो पोलिस झाकीर पट्टेवाले, कामटेचा मामेसासरा बाळासाहेब कांबळे यांना अटक केली आहे. हे सर्व जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी, परिस्थितीजन्य, वैद्यकीय, तांत्रिक पुरावे सीआयडीच्या पथकाने जमा केले आहेत. त्याशिवाय आतापर्यंत 55 हून अधिक जणांचे जबाबही नोंदविले आहेत. 

अनिकेतचा मृत्यू नेमका मारहाणीत झाला की ठरवून त्याला मारून मृतदेह नष्ट करण्यात आला. याबाबतही तपास करण्यात आला आहे. अनिकेतच्या खुनामागील कारणही सोमवारी स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे.