Mon, Apr 22, 2019 04:21होमपेज › Sangli › सांगली प्रशासनास ‘आयएसओ’

सांगली प्रशासनास ‘आयएसओ’

Published On: Jan 26 2018 1:16AM | Last Updated: Jan 25 2018 10:13PMसांगली : प्रतिनिधी

सांगली जिल्हा प्रशासनास आयएसओ 9001-2015 हे मानांकन मिळाले आहे. ‘इंडियन रजिस्टर क्‍वॉलिटी सिस्टीम’  या आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार काम करणार्‍या संस्थेतर्फे हे प्रमाणपत्र मिळाले आहे.  जिल्हाधिकारी कार्यालय, पाच प्रांत कार्यालये, दहा तहसीलदार कार्यालये यांना एकाच वेळी हे मानांकन मिळवणारा हा देशातील पहिलाच जिल्हा आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी  गुरुवारी  पत्रकार परिषदेत दिली. 
जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, कामात सुसूत्रता, गतिमानता, पारदर्शीपणा, टीमवर्क,  मानव संसाधनांचा योग्य वापर, लोकाभिमुख काम आदीसाठी आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार  काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. हे काम योग्य पद्धतीने होते की नाही, याची तपासणी त्रयस्थ संस्थेकडून होणे गरजेचे होते. 

ते म्हणाले, आपल्या कामातील त्रुटी शोधून ते सुधारण्याचे काम गेल्या चार  महिन्यांपासून सुरू होते. आंतरराष्ट्रीय दर्जानुसार काम करणार्‍या नेदरलँडच्या आरएव्ही या संस्थेशी संलग्‍न असलेल्या या संस्थेकडे अर्ज केला होता. आम्ही केलेल्या तयारीची पाहणी संस्थेच्या दोन पथकांनी दि. 19 ते दि.21 जानेवारी असे तीन दिवस केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील 22 विभाग, पाच प्रांत कार्यालये आणि दहा तहसीलदार कार्यालयांनी स्वतःची कामाची कार्यपद्धती(एसओपी) ठरवून घेतली. पथकांनी या विभागांना भेटी दिल्या. तपासणीनंतर झीरो पेंडन्सी सिस्टीमची चांगली अंमलबजावणी,  ऑनलाईन सॉफ्टवेअर,  ई-टपाल ट्रेकिंग, 1 कोटी 6 लाख कागदपत्रांचे केलेले स्कॅनिंग, कार्यालयीन शिस्त अशा चांगल्या कामांची दखल घेतली. त्याशिवाय कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षणात सातत्य, शासकीय योजनांची अंमलबजावणी, कार्यालयांच्या जुन्या इमारतीत सुधारणा, सुसज्ज आग प्रतिबंधक यंत्रणा आदी सूचना केल्या  आहेत.  ते म्हणाले, हे मानांकन तीन वर्षांसाठी मिळाले आहे. यापुढे तीन वर्षे हे पथक डिसेंबरमध्ये पाहणी करणार आहे. जे कामात सातत्य राखणार नाहीत, ते यातून बाजूला पडतील.