Tue, Apr 23, 2019 13:36होमपेज › Sangli › उमेदवारीसाठी धावपळ; इच्छुक लागले कामाला

उमेदवारीसाठी धावपळ; इच्छुक लागले कामाला

Published On: May 07 2018 2:04AM | Last Updated: May 06 2018 11:43PMसांगली : चिंतामणी सहस्रबुद्धे

महापालिकेच्या निवडणुकीत आता  टप्प्याटप्प्याने रंग येऊ लागला आहे. मिरजेत भाजपच्या स्थानिक कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यापाठोपाठ काँग्रेसने मिरजेतच प्रचाराचे रणशिंग फुंकले. सांगलीत कार्यकर्त्यांचे शिबिरही झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा  बुधवारी सांगलीत मेळावा होत आहे. त्यावेळी पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा जंगी सत्कार होणार आहे. शहरात मिरवणूकही निघणार आहे. त्यामुळे त्यावेळीच राष्ट्रवादीचा प्रचार सुरू होणार हे स्पष्ट आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादीची राज्यपातळीवर तरी आघाडी झाली आहे. पुढील प्रत्येक निवडणूक आघाडी करूनच लढवण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच झाला आहे. विधानपरिषद निवडणुकीत तशी आघाडी झाली आहे. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

भाजप-शिवसेनेची विधानपरिषद निवडणुकीत  युती झाली आहे. मात्र महापालिका निवडणुकीत ती होईल, की नाही याबद्दल साशंकता आहे. भाजपमधील एक गट आणि शिवसेनेतील एक गट अशी युती येथेही व्हावी, अशी इच्छा बाळगून आहे. इतर गटांना मात्र अशी संभाव्य युती अमान्य आहे.  याचे कारण त्यांचे स्वतःचेच उमेदवार अ‍ॅडजेस्ट करायचे आहेत. मनसे नेमकी कोणती भूमिका घेणार याकडेही त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. त्या पक्षातील एक गटही भाजपबरोबर युती करायच्या मानसिकतेत आहे.

 राजकीय पक्षांचे नेते एकीकडे युती, आघाडी किंवा सीट अ‍ॅडजेस्टमेंट अशा चर्चेत गुंतले आहेत.  त्याचवेळी प्रत्येक पक्षाचे इच्छुक कार्यकर्ते आपल्याला किंवा आपण सुचवलेल्याला उमेदवारी मिळणार की, नाही या चिंतेत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी  आघाडी झाली, तर आपल्या उमेदवारीचे कसे होणार, या चिंतेत काँग्रेसमधील अनेक इच्छुक आहेत. कारण जवळजवळ प्रत्येक प्रभागात काँग्रेसकडे प्रबळ दावेदारांची प्रचंड संख्या आहे. काँग्रेसमधील  प्रस्थापित पदाधिकारी, नगरसेवक  स्वतःही इच्छुक आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचीही सोय लावावी, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे त्या-त्या प्रभागातील नवीन इच्छुक अस्वस्थ आहेत. 

प्रस्थापितांनी आता एकतर घरी स्वस्थ बसावे किंवा मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी, असे त्यांचे म्हणणे आहे.  तशात राष्ट्रवादीबरोबर आघाडी झाल्यास काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
  प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र उत्साहात आहेत. जयंतरावांना महापालिका क्षेत्राची आणि येथील राजकीय परिस्थितीची खडानखडा माहिती आहे. सन 2008 ची निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली महाआघाडीने जिंकली होती. त्यामुळे महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादी बळकट करायची त्यांच्यावरही जबाबदारी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीनेही ते महत्वाचे आहे. 

त्याचवेळी राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवर दोन गट तरी ठळक आहेत. त्यांच्यात विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. त्यामुळे उमेदवारी वाटपात कोणत्या गटाचा वरचष्मा राहणार असा प्रश्न आहे.काँग्रेसबरोबर आघाडी झाल्यास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावतानाही कसोटी लागणार आहे. 

भाजपकडेही इच्छुकांची गर्दी आहे. जुने-नवे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. त्याचवेळी भाजपच्या उमेदवारीवर डोळा ठेवून अन्य पक्षातील अनेकजण  तळ्यात-मळ्यात उभे  आहेत.   भाजपने एक समिती स्थापन केली आहे. मात्र त्या पक्षातही   दोन-तीन गट ठळक आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्ही पक्षाचे काम केले आहे, त्यामुळे आता महापालिका निवडणुकीत उमेदवारी देताना आमचे ऐकले पाहिजे, असे अनेकांचे म्हणणे आहे. 

प्रत्येक प्रभागात चार उमेदवार असणार आहेत. त्यामुळे बहुसंख्य राजकीय पक्षाच्या इच्छुकांनी त्यांच्या सोयीनुसार तीन-चार उमेदवारांची आघाडी निश्चित करून ‘काम’ सुरू केले आहे. शहर सुधार समिती, डावी पुरोगामी आघाडी, आरपीआय, आप एमआयएम  या पक्षांनीही त्यांच्या पद्धतीने काम सुरू केले आहे.