होमपेज › Sangli › ‘होऊ द्या खर्च’वर आता आयकरची नजर

‘होऊ द्या खर्च’वर आता आयकरची नजर

Published On: Jun 14 2018 1:35AM | Last Updated: Jun 13 2018 11:12PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीतील ‘होऊ द्या खर्च’ अशा प्रथेला रोखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने काटेकोर नियोजन केले आहे. त्यासाठी स्वतंत्र आयकर निरीक्षकाची नियुक्‍ती केली आहे. मतदार आणि राजकीय पक्षांच्या होणार्‍या  खर्चावर आयकरची करडी नजर असणार आहे.

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता आठवडाभरात लागू होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला निवडणुकीची पूर्वतयारी करण्याची सूचना केली आहे. मतदान केंद्रांची निश्चिती, एव्हीएम मशीनची तयारी, उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसह आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. 

निवडणूक काळात उमेदवार व राजकीय पक्षांकडून मतदारांना प्रभावित करण्यासाठी आर्थिक बळाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याच्या तक्रारी केल्या जातात. अनेक प्रभागात दिग्गज उमेदवार आमने-सामने असले तर  पैशाचा चुराडा होत असतो. अशी चुरशीची लढत असलेल्या प्रभागातील उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून आयकर निरीक्षकांची नियुक्ती होणार आहे. या  निरीक्षकांना ठराविक प्रभागातील विशिष्ट उमेदवारांवर वॉच ठेवण्याची जबाबदारी दिली जाईल. प्रचार काळात भरारी पथकासह विविध यंत्रणांमार्फत संबंधित उमेदवाराबद्दलचे पुरावे गोळा केले जाणार आहेत. 

एका केंद्रात 800 मतदान

निवडणुकीसाठी प्रत्येक मतदान केंद्रात सुमारे 750 ते 800 मतदार असावेत, अशा आयोगाने सूचना दिल्या आहेत. त्यादृष्टीने महापालिकेने मतदान केंद्राची निश्चिती करावी, असे आदेश आयोगाने दिले आहेत. तेथे सर्व सुविधांचाही समावेश असावा. संवेदनशील व असंवेदनशील केंद्रांची यादी तयार करून त्यावर उपाययोजना आखण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.