Wed, Jul 17, 2019 16:19होमपेज › Sangli › अपयशी भाजपकडून सत्तेसाठी जाती-धर्मात तेढ

अपयशी भाजपकडून सत्तेसाठी जाती-धर्मात तेढ

Published On: Jul 31 2018 1:36AM | Last Updated: Jul 30 2018 10:25PMसांगली : प्रतिनिधी

अच्छे दिन आणू, महागाई कमी करू, रोजगार देऊ अशी खोटी आश्‍वासने देऊन भाजप सत्तेवर आला. पण गेल्या चार वर्षांत सरकार सपशेल अपयशी ठरले  आहे. त्यामुळे ते अपयश लपवण्यासाठी जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याचा उद्योग भाजप करीत आहे, असा आरोप युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम यांनी केला. सांगलीवाडीत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सांगतासभेत ते बोलत होते. महापालिकेत काँग्रेसच्या विजयाची सुरुवात सांगलीवाडीतूनच होईल, असा दावा त्यांनी केला.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेसनेत्या जयश्री पाटील, पक्ष निरीक्षक प्रकाश सातपुते, उमेदवार दिलीप पाटील, सौ. शुभांगी पवार, महाबळेश्‍वर चौगुले, उद्योजक अशोक पवार, नगरसेवक पांडुरंग भिसे, सौ. वंदना कदम, सचिन कदम, आनंदराव पाटील, विजयराव पाटील, अश्‍विन पाटील,  आदी उपस्थित होते.

डॉ. कदम म्हणाले, सांगली जिल्ह्याला आणि शहराला पद्मभूषण वसंतदादा पाटील, डॉ. पतंगराव कदम, मदनभाऊ पाटील यांच्या विचारांचा वारसा आहे. त्याच जोरावर मागील निवडणुकीत मदनभाऊ व डॉ. पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली आपण सत्ता मिळविली होती. त्यांच्या आदेशाने विकासकामे करून 90 टक्के विकासनामा पूर्ण केला आहे. आता या निवडणुकीतील विजय ही त्यांना श्रद्धांजली ठरेल.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीने एकमेकांना अडवा, जिरवा पद्धतीने खेळी केली. त्यामुळेच जनतेने भाजपला खोट्या आश्‍वासनांवर संधी दिली. मात्र त्यांनी जनतेची साफ निराशा केली आहे.अशा कारभाराला आता जनता कंटाळली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत त्यांचा पराभव ही आगामी 2019 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीची नांदी ठरेल. 

जयश्री पाटील म्हणाल्या, संघर्ष आपल्याला काही नवीन नाही. सांगलीवाडीतही अशाच प्रकारे संघर्ष सुरू आहे. पण जो संघर्ष करतो, तोच टिकतो हे उघड आहे. त्यामुळे या निवडणुकीतही काँग्रेसलाच जनता साथ देईल.

पृथ्वीराज पाटील म्हणाले, काँग्रेस विकासकामावर बोलते. भाजप फसवेगिरी, खोट्या आश्‍वासनांवर निवडणुकीला समोर जातो आहे. सांगलीवाडीत दमबाजी, दडपशाहीचे राजकारण सुरू आहे. पण जनता त्याला भीक घालणार नाही.