Wed, Jul 17, 2019 00:46होमपेज › Sangli › सांगलीत पोलिसांचा सौम्य लाठीमार

सांगलीत पोलिसांचा सौम्य लाठीमार

Published On: Aug 02 2018 2:01AM | Last Updated: Aug 02 2018 2:01AMसांगली : प्रतिनिधी

शहरातील प्रभाग 15 मधील गणेशनगर येथे कोणत्याही उमेदवाराला मतदान केल्यानंतर ते मत भाजपलाच जात असल्याची तक्रार बुधवारी दुपारी करण्यात आली. त्यानंतर सर्वच उमेदवार आणि त्यांचे समर्थक मतदान केंद्राबाहेर जमले होते. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. शिवाय, उमेदवारांमध्ये वादही होत होता. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. 

बुधवारी दुपारी एकच्या सुमारास गणेशनगर येथील भोई सांस्कृतिक भवन येथील मतदान केंद्रात कोणालाही मतदान केल्यानंतर ते भाजपलाच  होत असल्याची तक्रार उमेदवारांच्या प्रतिनिधीने केली. त्यानंतर सर्वच उमेदवारांनी या केंद्राकडे धाव घेतली. उमेदवारांचे समर्थकही मोठ्या प्रमाणात जमा झाले. 

या तक्रारीची माहिती मिळाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी भानुदास गायकवाड, मुख्य निवडणूक अधिकारी आयुक्त रविंद्र खेबुडकर यांनी मतदान केंद्रावर धाव घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणात जमाव जमून तणाव निर्माण झाल्याने पोलिस निरीक्षक रविंद्र शेळकेही फौजफाट्यासह तेथे दाखल झाले. त्यानंतर उमेदवारांना सांगूनही त्यांचे समर्थक केंद्रापासून जात नसल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. नंतर उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर यंत्राची चाचणी घेतल्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. या घटनेमुळे सुमारे तासभर या केंद्रावरील मतदान प्रक्रिया बंद पडली होती. उमेदवारांचे शंका निरसन झाल्यानंतर तणाव निवळला. 

माजी महापौर किशोर शहा ताब्यात, सुटका...

शहरातील चिंतामणीनगर झोपडपट्टी येथील मतदान केंद्राजवळ थांबून प्रभाग अकरामधील उमेदवारांसाठी पैसे वाटप करीत असल्याची तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी माजी महापौर किशोर शहा यांना ताब्यात घेतले होते. आमदार सुधीर गाडगीळ यांनीही याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. संजयनगर पोलिस ठाण्यात सुमारे दोन तास त्यांची चौकशी केल्यानंतर शहा यांची सुटका करण्यात आली. याबाबत पोलिस निरीक्षक प्रताप पोमण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वाद वाढत चालल्याने  शहा यांना ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यामध्ये  चौकशी केली, त्यावेळी त्यांच्याकडे दोन-तीन हजार रुपये आढळून आले. मात्र, पैसे वाटत असल्याचे काही दिसून आले नाही. त्यामुळे शहा यांना सोडून देण्यात आले.