Fri, May 29, 2020 04:27होमपेज › Sangli › फसव्या भाजपची हद्दपारी ही परिवर्तनाची नांदी

फसव्या भाजपची हद्दपारी ही परिवर्तनाची नांदी

Published On: Jul 31 2018 1:36AM | Last Updated: Jul 30 2018 10:15PMसांगली : प्रतिनिधी

केंद्र, राज्य शासनाच्या माध्यमातून भाजपच्या फसवणुकीच्या कारभाराचा जनतेने अनुभव घेतला आहे. त्यामुळे आता शहराचा विकास करू म्हणून महापालिकेत सत्तेसाठी धडपडणार्‍या भाजपला हद्दपार करा. ही लोकसभा, विधानसभा निवडणुकीची परिवर्तनाची नांदी ठरेल, असा दावा काँग्रेसनेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला. येथील शंभरफुटी रस्त्यावर एकता चौक तसेच खणभाग येथे काँग्रेसच्या प्रचार समारोपप्रसंगी ते बोलत होते. 

ते म्हणाले, महापालिका निवडणुकीत भाजपने भेटवस्तूंसह विविध प्रकारची खुलेआम आमिषे दाखविली होती. त्यामुळे धनशक्‍तीविरोधात ही जनशक्‍तीची लढाई आहे. जनता त्यांना हिसका दाखवेल.
यावेळी काँग्रेसनेत्या जयश्री पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, पक्ष निरीक्षक प्रकाश सातपुते, प्रभाग 15 चे काँग्रेसच उमेदवार मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, पवित्रा केरिपाळे, आरती वळवडे, रविंद्र वळवडे, बल्लू केरिपाळे, प्रभाग 16 चे उमेदवार महापौर हारुण शिकलगार, उत्तम साखळकर, पुष्पलता पाटील, रुपाली चव्हाण आदी उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, खोटे बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने 2014 मध्ये ते सत्तेवर आले, मात्र जनतेला आता त्यांच्या फसव्या कारभाराची जाणीव झाली आहे. महागाई, बेरोजगारी, नोटाबंदी आणि करांचा बोजा अशा पद्धतीने सर्वच पातळीवर जनतेला नाडण्याचा उद्योग या सरकारने केला. आता कारभारात अपयशी ठरल्यावर जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याचा उद्योग सुरू आहे. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम बांधवांना आरक्षणाबाबत सरकारने फसविले. आता पुन्हा महापालिका निवडणुकीसाठी आश्‍वासनांचा पाऊस पडून ते समोर आले आहेत. 

ते म्हणाले, या निवडणुकीत साम, दाम, दंडाचा वापर करण्याच्या सूचना भाजपकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार काही ठिकाणी अशा प्रकारे कारभारही सुरू आहे. पण गुंडगिरीची भाषा कराल तर याद राखा. 

जयश्री पाटील म्हणाल्या, काँग्रेसनेते मदन पाटील, डॉ. पतंगराव कदम यांनी मागील पाच वर्षांच्या निवडणुकीत जी आश्‍वासने दिली होती, ती आश्‍वासने पूर्ण केली आहेत. मात्र भाजपने महापालिका क्षेत्रात अडवणुकीचा उद्योग केला आहे. पृथ्वीराज पाटील म्हणाले, विकासाचा अजेंडा घेऊन काँग्रेस जनतेसमोर जाते. पण भाजपचा फसवेगिरीचा अजेंडा आहे. आता जनता या फसवेबहाद्दरांना जागा दाखवेल.