Sun, Mar 24, 2019 08:35होमपेज › Sangli › भाजप सरकारकडून तरुणांची फसवणूक

भाजप सरकारकडून तरुणांची फसवणूक

Published On: Jul 30 2018 1:32AM | Last Updated: Jul 29 2018 11:56PMमिरज : प्रतिनिधी

भाजपने सत्तेवर येण्यापूर्वी दोन कोटी तरुणांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली, असा आरोप प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार डॉ. विश्‍वजीत कदम यांनी केला. महापालिका निवडणुकीत प्रभाग क्र. 2 मध्ये काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी सैनिक वसाहतीमध्ये आयोजित  सभेत ते बोलत होते. 

ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येण्यापूर्वी दोन कोटी तरुणांना नोकरी देण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु चार वषार्ंचा  कालावधी लोटला तरी तरुणांना नोकर्‍या मिळालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी एकप्रकारे तरुणांची फसवणूक केली आहे.

आमदार कदम म्हणाले,जीएसटी आणि नोटाबंदीमुळे सामान्य नागरिकांच्या पदरी घोर निराशा आली आहे.  दि.1 जुलै 2017 पासून मोदी सरकारने जीएसटी कायद्याची अंमलबजावणी केली. देशात सर्व वस्तूंचे समान दर ठेवण्यात येतील असे सांगितले होते.  प्रत्यक्षात पेट्रोल, डिझेलचा जीएसटी दरात समावेश करण्यात आला नाही.त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे  वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे दर आहेत. त्यामुळे जीएसटी कायद्यासंदर्भात सरकारने दिलेल्या आश्‍वासनाला सरकारनेच हरताळ फासला आहे.

आमदार डॉ. कदम म्हणाले, जीवनावश्यक वस्तू दरातील फरकामुळे महागाईमध्येच वाढ झाली आहे. सामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनात लागणार्‍या जीवनावश्यक वस्तूंचे दर भडकले आहेत. मात्र त्याकडे सरकारचे सोयीस्कर दुर्लक्ष झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदी करुन नागरिकांना समस्यांच्या खाईमध्ये लोटले आहे. 

ते म्हणाले, काळा पैसा बाहेर काढू असे पंतप्रधान म्हणाले होते. परंतु प्रत्यक्षात तो बाहेर आला नाही. याउलट काळ्या पैशांना प्रोत्साहनच मिळाले आहे. स्वीस बँकेतील भारतीयांच्या ठेवींत पन्नास टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतीय बँकांना बुडवून अनेक घोटाळेबाज परदेशात निवांत असून ऐशोआराम करीत आहेत.

काँग्रेस नेते प्रा. सिद्धार्थ जाधव म्हणाले,  महापालिका निवडणुकीत भाजपने सामान्यांचे प्रश्‍न बाजूला ठेवले आहेत. भेट वस्तूंचे आमिष दाखवून लोकांना त्यांना भुलविण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. सुज्ञ मतदार त्या आमिषाला बळी पडणार नाहीत. जनता विकास कामांनाच साथ देईल, वहीदा नायकवडी, अय्याज नायकवडी, कुमार पाटील, महावीर खोत, सविता शेडजी-मोहिते, समीर मालगावे इत्यादी उपस्थित होते.