Thu, Jun 27, 2019 09:55होमपेज › Sangli › मनपाचे शाखा अभियंता निलंबित

मनपाचे शाखा अभियंता निलंबित

Published On: Jan 11 2018 1:08AM | Last Updated: Jan 10 2018 10:46PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

वरिष्ठ अधिकार्‍यांना न जुमानता रजेवर राहणे. त्या कालावधीत महापालिकेची कामे परस्पर ‘बाहेर’  करण्याचा शाखा अभियंत्याचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल शाखा अभियंता डी. डी. पवार यांना आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी गुरुवारी तडकाफडकी निलंबित केले. दि. 31 डिसेंबरला रजा संपूनही रीतसर कामावर हजर न राहता बाहेरच्या बैठकांना ते हजर राहत होते, असे खेबुडकर यांनी सांगितले.

ते म्हणाले, पवार हे बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कामाबद्दल पदाधिकारी व नगरसेवकांच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या. कार्यालयीन वेळेत पवार कधीच कार्यालयात भेटत नाहीत. वारंवार रजेवर जातात. त्यामुळे अन्य अधिकार्‍यांवर कामाचा ताण येतो. वरिष्ठांची परवानगी न घेता, मनमानीपणे ते एक जानेवारीपासून रजेवर आहेत. मात्र, तरीही या काळात त्यांनी घरी बसून परस्पर काही मोजमाप पुस्तके नोंदवली. 

कामांची खासगी अंदाजपत्रके करणे तसेच पालिकेची अन्य  कामे केल्याचे निदर्शनास आले. 

खेबुडकर म्हणाले, दोन दिवसांपूर्वी रस्त्यांच्या दुबार  कामांंबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बैठकीला ते हजर होते. मात्र ते महापालिकेत गैरहजर होते. त्यांच्या एकूणच कार्यप्रणालीवर पदाधिकारी, नगरसेवक, नागरिक आणि अधिकारीही नाराज होते. याबाबत वारंवार त्यांना तोंडी समज देण्यात आली होती. मात्र, त्यांच्या कार्यपद्धतीत फरक पडला नाही. त्यामुळे त्यांना कर्तव्यात कसूर करीत असल्याबद्दल तडकाफडकी  निलंबित केले आहे.