Tue, May 21, 2019 04:30होमपेज › Sangli › सांगली : चांदोलीतील धबधबे पर्यटकांपासून वंचित

सांगली : चांदोलीतील धबधबे पर्यटकांपासून वंचित

Published On: Aug 21 2018 1:26PM | Last Updated: Aug 21 2018 1:28PMवारणावती : आष्पाक आत्तार

चांदोली परिसरावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे.  येथील सौंदर्य पाहण्यासाठी दररोज अनेक पर्यटक चांदोलीला भेट देतात.  पावसाळ्यात तर येथील सौंदर्य डोळ्यात साठवून ठेवावं असंच असतं  मात्र ऐन पावसाळ्यात येथील पर्यटन बंद असल्यामुळे पर्यटकांना आल्यापावली परत फिरावे लागते. त्यामुळे पर्यटकांमधून निराशेचा सूर उमटत आहे. 

पर्यटन बंद असल्यामुळे पर्यटकांच्‍यात नाराजी

चांदोली धरण, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प,  गुढे- पाचगणी पठार, छोटे- मोठे धबधबे,  हिरवा गर्द  निसर्ग ही या ठिकाणची मुख्य पर्यटन स्थळे आहेत.  शासनानेही येथील पर्यटन विकास करण्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. त्यामुळे येथे पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे.  ऐन पावसाळ्यात सुरक्षेच्या दृष्टीने येथील चांदोली धरण व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी चार महिन्यांसाठी बंद केले जाते. मात्र याच दिवसांत मुसळधार पावसामुळे या ठिकाणचा परिसर हिरवा गर्द झालेला असतो.  परिसरातील छोटे -मोठे धबधबे ओसंडून वाहत असतात. हे पावसाळी दिवस पर्यटकांना साद घालत असतात. मात्र याच कालावधीत पर्यटन बंद असल्यामुळे पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता येत नाही.  त्यामुळे पर्यटक चांदोलीकडे पाठ करु लागले आहेत. 

या परिसरात निसर्गाच्या सानिध्यात लपलेले अनेक़ धबधबे आहेत. यात तीनशे फूट उंचीवरून कोसळणारा  उखळु धबधबा, शितुरजवळील आगर कडाचा धबधबा, सोनवडे जवळील मरगोबाचा धबधबा असे अनेक मनमोहक धबधबे आहेत मात्र  पर्यटकांच्या नजरेपासून ते  वंचित आहेत. 

धबधब्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मार्ग नाही 

या धबधब्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मार्ग नाही शिवाय दऱ्याखोऱ्यातून हे धबधबे वाहत असल्यामुळे पर्यटकांना नजरेस पडत नाहीत. या धबधब्यापर्यंत पोहोचायचेच म्हटले तर जीव मुठीत घेऊन इथपर्यंत पोहोचावं लागतं त्यामुळे पर्यटक फारसे तिकडे फिरकत नाहीत.  ऐन पावसाळ्यात पर्यटन बंद दुसरीकडे धबधब्यापर्यंत जायचं म्हटलं तर मार्ग नाही त्यामुळे येथे आलेला पर्यटक निराशेच्या वाटेने परत जात आहे. चांदोलीचा पर्यटन विकास करताना या धबधब्यांचा ही विचार होण्याची सध्या गरज आहे .