सांगली : प्रतिनिधी
सध्या भर पावसाळ्यात येळवी (ता.जत)येथे गेल्या महिनाभर झाले गावात पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत असून याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष आहे. जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.
गावातील पाणीपुरवठा विहिरीत पाणी असूनही पाणी उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती येळवीकरावर आली आहे. याला येळवी ग्रामपंचायतचा कारभार जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. ऐन पावसाळ्यात विहिरीला पाणी असूनही विद्युत पंप चोरीला गेल्यामुळे ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा खंडित केला आहे.
याबद्दल तक्रार जत पोलिस स्टेशनमध्ये देऊनही अद्याप तपास लागला नाही. तरी ग्रामपंचायतने पर्यायी व्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्यामुळे सध्या सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. यामुळे महिला वर्गांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ग्रामपंचायत ने मानवनिर्मित दुष्काळ निर्माण केला असल्याचा ग्रामस्थातून आरोप होत आहे.