Wed, Jan 22, 2020 12:51होमपेज › Sangli › वाटमारींचे वाढते प्रमाण चिंताजनक

वाटमारींचे वाढते प्रमाण चिंताजनक

Published On: Dec 16 2017 1:47AM | Last Updated: Dec 15 2017 11:57PM

बुकमार्क करा

सांगली ः प्रतिनिधी

शहरात घरफोड्यांनी धुमाकूळ घातला असतानाच वाटमारींचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन महिन्यांत सांगली - कोल्हापूर रस्त्यावर हत्याराच्या धाकाने अनेकांना लुटण्यात आले आहे. वाटमारीच्या घटना सातत्याने घडत असतानाही कोल्हापूर रस्ता परिसरात पोलिसांची नाकाबंदीच बंद असल्याचे दिसून येते. त्यामुळे कोल्हापूर रस्ता परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरात दिवसाढवळ्या घरे फोडली जात आहेत. त्याशिवाय चालत्या वाहनावरील महिलेची पर्स हिसडा मारून नेली जात आहे. मोठी वाहने अडवून प्रवाशांना धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लुटले जात आहे. गेल्या दोन महिन्यात कोल्हापूर रस्त्यावर असे प्रकार वाढले असतानाही पोलिसांनी त्यावर कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत.

प्रमुख राज्यमार्ग असूनही या रस्त्यावर नाकाबंदी केली जात नाही. अनिकेत कोथळेचा खून होण्यापूर्वी कोल्हापूर रस्त्यावर नाकाबंदीसह अन्य कारणांसाठी पोलिसांचा सातत्याने वावर असायचा. त्याशिवाय अंकली येथेही वारंवार रात्रीची नाकाबंदी केली जात होती. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून या रस्त्यावर  दिसणारे पोलिस कोठे गायब झाले आहेत, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.  यापूर्वी आडमार्गावर तसेच रहदारी कमी असलेल्या परिसरात अशा घटना घडत. मात्र आता हमरस्त्यावर आणि वस्तीच्या ठिकाणी अशा घटना घडत आहेत. कोल्हापूर रस्ता परिसरातील उपनगरांमध्ये स्ट्रीट लाईट  नाहीत. घरांची संख्याही तुरळक आहे.  या परिसरात शेतीही असल्याने गुन्हा करून पळून जाण्यास चोरट्यांना वाव असल्याने वाटमारीच्या घटना वारंवार घडत आहेत. 
घरफोडींचे प्रमाण वाढल्याने शहरातील नागरिक धास्तावले असतानाच आता चालत्या वाहनावरील ऐवजही लंपास केला जाऊ लागला आहे.