Thu, Apr 25, 2019 15:26होमपेज › Sangli › मतदानाचा टक्का घटला; सुशिक्षितांची उदासीनता

मतदानाचा टक्का घटला; सुशिक्षितांची उदासीनता

Published On: Aug 03 2018 1:38AM | Last Updated: Aug 02 2018 11:31PMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक प्रशासनाने बरीच प्रचार, प्रसिद्धी केली. मतदार जागृती रॅली काढली. मतदान केंद्रावर रांगोळी, तोरण, पताके, विद्युत रोषणाई एवढेच नव्हे तर काही मतदान केंद्रांवर मतदारांसाठी ‘रेड कार्पेट’ अंथरले होते. मात्र, तरीही 38 टक्के मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. 

मोठ्या शहराची स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका होय. नागरी सेवा, सुविधा, शहराचा विकास व प्रगतीची जबाबदारी या स्थानिक स्वराज्य संस्थेवर असते. स्थानिकांच्या सहभागाने स्थानिकस्तरावर कारभार हा उद्देश त्यामागे आहे. व्यवस्था, उद्देश कितीही चांगला असला तरी महापालिकेत निवडून जाणारे नगरसेवक आणि प्रत्यक्ष काम करणारे प्रशासन यावर महापालिकेचा कारभार अवलंबून असतो. त्यामुळे निवडून जाणारे नगरसेवक तितक्याच तोलामोलाचे असणे आवश्यक असतात. निवडणुकीत असे उमेदवार उभे करण्याचे कर्तव्य प्रत्येक राजकीय पक्षाचे आहे आणि चांगल्या उमेदवाराला निवडून देण्याचे कर्तव्य प्रत्येक मतदाराचे आहे. 

निवडणुकांमधील कमी मतदान हा विषय चिंतेचा आणि चिंतनाचा बनला आहे. राजकारण आणि राजकीय व्यवस्था याविषयी लोकांची मानसिकता नकारात्मक झाली आहे, का असा प्रश्‍न या निमित्ताने पुढे येत आहे. निवडणुकीत मतांचा जोगवा मागणारे पुन्हा पाच वर्षे फिरकत नाहीत, असा समज पक्का होत चालला आहे. कितीही ओरड केली तरी नागरी सेवा, सुविधांचा प्रश्‍न ‘जैसे थे’ राहतो. मग यांना कशाला मते द्या, अशी मानसिकता दृढ होऊ लागली आहे. त्यामुळे मतांचा टक्का घसरत आहे. महापालिका क्षेत्रात सुशिक्षितांचा भाग म्हणून प्रभाग 17 ची ओळख आहे. मात्र, या प्रभागात सर्वात कमी म्हणजे 54.64 टक्के मतदान झाले आहे. 

महापालिकेचा कारभार, महापालिका क्षेत्रातील सेवा-सुविधांवरून लोक गप्पा-गोष्टी बर्‍याच करतात. पण प्रत्यक्षात चांगले उमेदवार निवडून देण्याची वेळ येते तेव्हा अनेकजण मतदानाकडे पाठ फिरवून दिवसभर घर अथवा कार्यालयात मग्न असतात किंवा पिकनिकला जाणे पसंत करतात असे दिसून येते आहे. मतदारांमध्ये ही उदासिनता का आली याचेही आत्मपरीक्षण राजकीय मंडळींनी करणे आवश्यक आहे. 

महापालिकेचा एक  प्रभाग 20 हजार ते 26 हजार मतदारांचा आहे. एका प्रभागात चार उमेदवार निवडून द्यायचे आहेत. प्रभागाचा विस्तार आणि मतदारांची संख्या वाढल्याने अनेक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. 

महापालिकेची सन 2008 व 2013 च्या निवडणुका राज्यस्तरीय मात्तबर नेत्यांच्या प्रचार सभांनी गाजल्या होत्या. यावेळी अशा सभांचा अभाव दिसला. निवडणुकीचे वातावरण म्हणावे तसे तापले नाही.  त्याचाही थोडा परिणाम मतदानावर झाला आहे. 

स्थलांतरित मतदार...!

नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमित्त अन्य शहरांमध्ये स्थलांतरीत झालेले मतदार, अनेक वर्षे स्थायिक असलेले पण शहर सोडून मूळ गावी अथवा अन्यत्र स्थलांतरित झालेले मतदार याचाही परिणाम मतदानाची टक्केवारी कमी होण्यात झाला आहे. मतदार यादी अपडेट करण्यासाठी घरभेटीवेळी अनेकदा नागरिकांची घरे बंद असतात. मतदार यादी अपडेटसाठी मतदारांकडून दाद दिली जात नाही. यादी अपडेट करण्याचे काम महापालिकेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना द्यावे, असा पर्याय पुढे येत आहे.