Sun, Mar 24, 2019 06:41होमपेज › Sangli › 112 कोटींसाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटणार

112 कोटींसाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटणार

Published On: Feb 14 2018 1:55AM | Last Updated: Feb 13 2018 11:55PMसांगली : प्रतिनिधी

सांगली, कोल्हापूरसह आठ जिल्हा बँकांकडील पाचशे, हजाराच्या रद्द नोटांचे शिल्लक 112 कोटी रुपये आरबीआय व नाबार्डने बुडीत ठरविल्याच्या विरोधात जिल्हा बँकांचे शिष्टमंडळ केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटणार आहे. 112 कोटी रुपये ‘आरबीआय’ने स्वीकारावेत, यासाठी विनंती करणार आहे. दरम्यान, कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचाही निर्णय झाला. 

पुणे येथे आठ जिल्हा बँकांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. पुणे व अहमदनगर जिल्हा बँकांचे अध्यक्ष तसेच सांगली, कोल्हापूर, नाशिक, वर्धा, अमरावती, नागपूर या सहा जिल्हा बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी/ व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते. सांगलीतून मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण उपस्थित होते. 

केंद्र शासनाने दि. 8 नोव्हेंबर 2016 रोजी मध्यरात्रीपासून पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. आरबीआयच्या अधिसूचनेनुसार दि. 10 नोव्हेंबरपासून बँकांनी पाचशे, हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास सुरुवात केली. जिल्हा बँकांना चार दिवसांनी म्हणजे दि. 14 नोव्हेंबर रोजी पाचशे, हजार रुपयांच्या नोटा स्विकारण्यास मनाई करण्यात आली होती.  या चार दिवसात जिल्हा बँकांनी स्विकारलेल्या पाचशे, हजार रुपयांच्या नोटा ङ्गआरबीआयफने न्यायालयीन लढाईनंतर स्विकारल्या. मात्र जिल्हा बँकांकडील दि. 8 नोव्हेंबर 2016 रोजी व त्यापूर्वीच्या नोटा न स्विकारण्याचा पवित्रा घेतला आहे. 

सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, वर्धा, अमरावती, नागपूर या आठ जिल्हा बँकांकडील पाचशे, हजार रुपयांच्या रद्द नोटांचे शिल्लक 112 कोटी रुपये  या बँकांकडे पडून आहेत. आता ही रक्कम बुडीत समजून एनपीए तरतूद करण्यास नाबार्डने कळविले आहे. त्यामुळे जिल्हा बँकांनी त्याविरोधात कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांना भेटून 112 कोटी रुपये आरबीआयने स्विकारावेत यासाठी विनंती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.