Thu, May 28, 2020 09:37होमपेज › Sangli › सांगली : कोथळे कुटुंबीयांचे उपोषण मागे      

सांगली : कोथळे कुटुंबीयांचे उपोषण मागे      

Published On: Dec 11 2017 5:42PM | Last Updated: Dec 11 2017 5:42PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे याच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्याबाबत पालकमंत्री सुभाष देशमूख आणि आमदार सुधीर गाडगीळ यांनी फोनवरून आश्‍वासन दिल्यानंतर कोथळे कुटुंबीयांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण दुपारी मागे घेण्यात आले. त्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने पुढाकार घेतल्यानंतर जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील व पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या मध्यस्थीमुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

बडतर्फ पोलिस उपनिरिक्षक युवराज कामटे याच्यासह त्याच्या साथिदारांनी अनिकेतचा खून केला. त्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. हा प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर सांगलीत जोरदार प्रतिक्रिया उमठल्या. सर्वपक्षीय कृती समितीच्या पुढाकाराने शहरात जोरदार आंदोलन छेडण्यात आले. कामटेसह त्याच्या साथीदरांना बडतर्फ करून अटक करण्यात आली. राज्य सरकारला त्याची दखल घ्यावी लागली. कोथळे कुटुंबीयांना दहा लाख रुपये मदतीचा धनादेश देण्यात आला. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि पोलिस उपअधीक्षक डॉ. दिपाली काळे यांची बदली करण्यात आली. सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्वल निकम याची नियुक्ती करण्यात आली. त्याशिवाय या कुटुंबीयांची अनिकेतच्या पत्नीला सरकारी नोकरी मिळावी, अशी मागणी आहे. त्यासंदर्भात अनिकेतची पत्नी संध्या, वडील अशोक, आई आलका, भाऊ  अशिष व अमित हे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. 

या ठिकाणी कृती समितीचे समीत कदम, सतिश साखळकर, महेश खराडे आदी आले. त्यांनी जिल्हाधिकारी काळम-पाटील आणी अधीक्षक शर्मा यांच्याबरोबर चर्चा केली. त्यानंतर कोथळे कुटुंबीयांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून घेऊन त्यांचा पालकमंत्री देशमुख आणि आमदार गाडगीळ यांच्याशी संपर्क करून दिला. या दोघा नेत्यांनीही आम्ही तुमच्या दुखःत सहभागी आहोत.  तुमच्या बहुतेक मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. सरकारी नोकरी देण्याची मागणीही आम्ही पूर्ण करु असे आश्‍वासन दिले. त्यावर जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते सरबत देऊन हे उपोषण सोडण्यात आले. यावेळी कोथळे कुटुंबीयांनी विशेष पोलिस  महानिरिक्षक विश्‍वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी काळम-पाटील आणि अधीक्षक शर्मा यांनी घेतलेल्या सहकार्याच्या भूमिकेबद्दल आभार मानले.