Tue, Jul 23, 2019 11:37होमपेज › Sangli ›  सांगली : अग्रणी नदी अतिक्रमणाच्या विळख्यात

 सांगली : अग्रणी नदी अतिक्रमणाच्या विळख्यात

Published On: Sep 01 2018 3:25PM | Last Updated: Sep 01 2018 3:23PMतासगाव : दिलीप जाधव

तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यांच्या हद्दीतील अग्रणी नदीचे पात्र अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. गावपुढारी आणि धनदांडग्यांनी नदीकाठाला विहीर खोदून नदीपात्रात कचरा टाकला आहे. अनेक गावांच्या हद्दीतील जवळपास निम्मे नदीपाञच गायब झाले आहे. ग्रामपंचायत व तालुका पातळीवरील प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीची भूमिका घेतली आहे. अतिक्रमण करणा-यांना कोणत्याही कारवाईचा धाक नाही. त्यांचे मनोधैर्य वाढतच चालले आहे. परिस्थिती अशीच राहीली तर अग्रणीपाञ शोधण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.

खानापूर तालुक्यातील तामखडीजवळ अडसरवाडी येथे अग्रणी नदीचा उगम झाला आहे. डोंगरात उगम पावलेली अग्रणी खानापूर, तासगाव आणि कवठेमहांकाळ या तीन तालुक्यातून ५५ किलोमिटर प्रवास करत अग्रणी नदी कर्नाटकातील अथणी तालुक्यात कृष्णा नदीला मिळते. खानापूर तालुक्यातील २२ किलोमीटर पाञ सोडले तर तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या हद्दीतील पाञ अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे.

तासगाव तालुक्यातील वायफळे, यमगरवाडी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, गव्हाण आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगांव, बोरगांव, शिरढोण, मोरगाव,हिंगणगाव, देशिंग,विठूरायाचीवाडी,अग्रण धुळगाव, रांजणी,लोणारवाडी या गावांच्या हद्दीतील नदीपाञात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. 

विहीर खुदाई करण्याचा सपाटा 

गेली चार ते पाच वर्षे म्हैसाळच्या कालव्यातून सातत्याने पाणी वाहत आहे. यामुळे नदी पाञालगतची पाणीपातळी वाढली आहे. पाण्याचा उपसा करण्यासाठी पाञालगत विहीरखुदाई करण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरु आहे. खासकरुन तासगाव तालुक्यातील गव्हाण आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव येथील शेतक-यांनी अग्रणीपाञालगत मोठ्या प्रमाणावर विहीरी खोदल्या आहेत. स्थानिक शेतक-यांबरोबर तासगाव तालुक्यातील अंजनी, वडगांव, लोकरेवाडी, नागेवाडी, सावळज, मिरज तालुक्यातील करोली एम येथील धनदांडग्यांनी पात्रालगत जमीन खरेदी करुन विहीर खुदाई करण्याचा सपाटा लावला आहे.   

नदीपात्रच झाले गायब

 तासगाव तालुक्यातील गव्हाण व कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगांव हद्दीत विहीरखुदाई करणार्‍यांनी कहरच केला आहे.  नदीपाञालगतची जागा विकत घ्यायची आणि थेट पाञातच विहीर खोदायची असा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. हे प्रकार रोखण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस गावपातळीवर काम करणार्‍या महसूल प्रशासनात नाही. यामुळे खुदाई करणा-यांचे आणखीनच फावले आहे. बडे धेंडे आता पाञालगत खोदलेल्या विहिरींचा कचराही आता पाञात टाकू लागले आहेत. यामुळे गव्हाण आणि मळणगांव हद्दीतील निम्मे नदीपाञच गायब झाले आहे.