Fri, May 24, 2019 20:32होमपेज › Sangli › मुख्यालयी न राहणार्‍या डॉक्टर, कर्मचार्‍यांवर कारवाई

मुख्यालयी न राहणार्‍या डॉक्टर, कर्मचार्‍यांवर कारवाई

Published On: Jun 12 2018 12:53AM | Last Updated: Jun 12 2018 12:10AMसांगली : प्रतिनिधी

प्राथमिक आरोग्य केंद्रांकडील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचार्‍यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्य करणे अनिवार्य आहे. त्यामध्ये हयगय झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करावी, असे आदेश सोमवारी जिल्हा परिषद आरोग्य समिती सभेत देण्यात आले. 

जिल्हा परिषदेत सोमवारी आरोग्य समिती सभा झाली.  अध्यक्षस्थानी सभापती तम्मनगौडा रवि होते. सदस्य रेश्मा साळुंखे, सविता कोरबु, मनोहर पाटील, निजाम मुलाणी, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी तसेच पंचायत समितींचे तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. 

पावसाळा सुरू झाला आहे. साथीच्या आजारांची शक्यता असते. त्यामुळे रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रभावी रुग्णसेवा मिळणे आवश्यक आहे. आरोग्य केंद्रांकडील डॉक्टर (वैद्यकीय अधिकारी), आरोग्य कर्मचार्‍यांनी मुख्यालयी वास्तव्य करणे अनिवार्य आहे. त्याबाबत कार्यवाही न झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई होईल, असे सभापती रवि यांनी बजावले. यासंदर्भातील प्रश्‍न सदस्या रेश्मा साळुंखे यांनी उपस्थित केला होता. 

बालगाव येथे दि. 21 जून रोजी जागतिक योगदिनानिमित्त सूर्यनमस्कार शिबीर आयोजित केले आहे. सूर्यनमस्काराचे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे, अशी माहिती सभापती रवि यांनी दिली. 

सदस्यांना विश्‍वासात घ्या
शासनाच्या आरोग्यविषयक योजना राबविताना अधिकार्‍यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना विश्‍वासात घ्यावे, अशा सुचना दिल्या.