Thu, Apr 25, 2019 11:28होमपेज › Sangli › सांगली : कुंडलचे क्रांती कुस्ती संकुल गहिवरले

सांगली : कुंडलचे क्रांती कुस्ती संकुल गहिवरले

Published On: Jan 13 2018 4:45PM | Last Updated: Jan 13 2018 5:17PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

कुंडल (ता. पलूस) येथील क्रांती कुस्ती संकुलातील मल्लांच्या गाडीला अपघात होऊन, पाच मल्लांचा बळी गेला. शुक्रवारी (१२ जानेवारी) औंध येथील यमाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मैदानात कुस्त्या करून परतत असताना रात्री १ च्या सुमारास शिरगांव फाटा येथे अपघात झाला. यात ५ पैलवानांसह ड्रायव्हर अशा ६ जणांचा मृत्यू झाला.

पैलवानांच्या या दुर्दैवी मुत्यूची बातमी वार्‍यासारखी पसरली. अपघाताची माहिती क्रांती कुस्ती संकुलात कळताच संपूर्ण तालीमच गहिवरली. या संकुलातील निधड्या छातीचे अनेक तरूण मल्ल आपल्या सहका-यांच्या जाण्याने धाय मोकलून रडू लागले.  कुस्ती केंद्रात सध्या सुमारे १३० मल्ल कुस्तीचे अद्यावत प्रशिक्षण घेत महाराष्ट्रातील कुस्ती मैदानात आपआपले नाव कमावत आहेत. काल त्यातील काही पैलवान औंध येथील यमाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मैदानात कुस्त्या करून परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. या अगोदर २०१२ मध्येही क्रांती कुस्ती केंद्रातील दोन मल्ल प्रविण दत्तात्रय लाड व प्रविण भिमराव लाड रा. कुंडल (ता. पलूस) या मल्लांचा दुर्देवी मृत्यू झाला होता.

गेल्या ४ वर्षांत क्रांती कुस्ती केंद्रातील मल्ल लहान वजनी गटात पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कुस्ती मैदाने गाजवत आहेत. तालीम व तालमीतील मल्ल राज्यभर नावारुपाला येत आहेत. अनेक उमद्या मल्लांचे पाय या तालमीकडे वळताना दिसत आहेत. काल रात्री घडलेल्या दुर्देवी घटनेमुळे तालमीवर शोककळा पसरली आहे. 

संबंधित बातमी वाचा : सांगलीतील अपघाताने महाराष्‍ट्र हळहळला; ५ पैलवानांचा मृत्यू

सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी कुस्ती क्षेत्रात नाव कमवावे यासाठी क्रांती कुस्ती संकुलाची उभारणी केली आहे. पण काल घडलेली घटना अत्यंत दुर्देवी असून यामुळे कुंडल गावासह क्रांती परिवाराला मोठा धक्का बसला आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मल्ल क्रांती कुस्ती संकुलात प्रशिक्षण घेऊन राज्यातील कुस्ती मैदानात नाव मिळवत होते. या घटनेने क्रांती परिवाराचे व कुस्ती क्षेत्रातील भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या परिवाराच्या दुखात क्रांती समुह सहभागी आहे. अपघातात मयत झालेल्या मल्लांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख व जखमी मल्लांना प्रत्येकी 50 हजार रूपयांची मदत क्रांती उद्योग समुहाच्या वतीने जाहीर केले आहेत. भविष्यात अशा दुर्देवी घटना घडू नयेत यासाठी क्रांती परिवार प्रयत्न करेल.

- अरूणअण्णा लाड (अध्यक्ष - क्रांती उद्योग समुह, कुंडल)

मल्लांच्या अपघाती निधनाने कुस्तीक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तसेच कुस्ती क्षेत्राचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुखात आम्ही सर्व सहभागी आहोत. 

- शरद लाड (सदस्य, जिल्हा परिषद, सांगली)

हे मल्ल काल औंध येथील मैदानात चांगले खेळून विजयी झाले होते.  हे सर्व मल्ल क्रांती कुस्ती संकुलाचे मानधनधारक मल्ल होते. तसेच शुभम घारगे, सौरभ मोरे हे राष्ट्रीय मल्ल म्हणून नावारूपाला आले होते. या दुर्देवी घटनेने कुस्ती क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून कुस्ती क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

- सुनील  मोहीते  ( प्रशिक्षक - क्रांती कुस्ती संकुल,  कुंडल)

सुमारे पाच वर्षापूर्वी अशाच घटनेला कुंडल गावांस सामोरे जावे लागले होते. त्यातून सावरतो तोपर्यंत ही दुसरी दुर्देवी घटना कुस्ती क्षेत्रात घडली आहे. यापुढच्या काळात मल्लांच्या प्रवासासाठी प्रशिक्षित चालक व वाहनांची व्यवस्था करावी लागेल.  या दुर्देवी घटनेने राष्ट्रीय संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे.

- बाळासाहेब लाड  (अध्यक्ष - कुंडल यात्रा समिती)

अशा घटना टाळण्यासाठी राज्यातील सर्व कुस्ती मैदाने सायंकाळी ६ च्या दरम्यान संपवावीत. जेणेकरून मल्ल प्रथम क्रमांकाच्या कुस्त्या पाहून जेवण करून साधारणत: रात्री ९ ते १० च्या दरम्यान तालमीत परततील. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत प्रवास करावा लागणार नाही. त्याचबरोबर मल्लांबरोबर वरिष्ठ वस्ताद असणे गरजेचे आहे. या अपघातातील जखमी मल्ल हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. या मल्लांना समाजातील दानशुर व्यक्तींनी मदत करण्याची गरज आहे.

- गणेश मानुगडे