Thu, Jul 18, 2019 02:38होमपेज › Sangli › सांगलीत आज बहुजन संघटनांतर्फे शिवजयंती

सांगलीत आज बहुजन संघटनांतर्फे शिवजयंती

Published On: Feb 18 2018 10:42PM | Last Updated: Feb 18 2018 10:42PMसांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी सांगली, मिरज, इस्लामपूर शहरासह जिल्ह्यात  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 20 हून अधिक बहुजन संघटनांतर्फे भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. याबरोबरच जिल्ह्यातही शिवजयंतीनिमित्त विविध सामाजिक प्रबोधनांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

बहुजन प्रतिपालक शिवमहोत्सव समितीच्यावतीने सकाळी 6 वाजता घरोघरी, संस्था, संघटना यांच्या ठिकाणी  जावून शिवप्रतिमेस अभिवादन करण्यात येणार आहे.  सकाळी 9 वाजता स्टेशन चौकातून मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. 10.30 वाजता  छत्रपती शिवाजी महाराज गौरव   रथ    व मिरवणूक निघणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशभूषा केलेले मावळे, लेझिम, झांजपथक, लाठी-काठी आदी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन  जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे  म्हणून पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत उपस्थित राहणार आहेत.  त्यानंतर सायंकाळी 5 वाजता स्टेशन चौकात पुरुष व महिला गटात छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय खुल्या वक्‍तृत्व स्पर्धा होणार आहेत.  यावेळी  याचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्याहस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिशन देवढे, सहाय्यक समाजकल्याण आयुक्‍त सचिन कवले उपस्थित राहणार आहेत. 

आटपाडी   ः  येथे सोमवारी (दि. 19) शिवजयंती सोहळा होत आहे. यानिमित्त शिवजयंती उत्सव मावळा समितीच्यावतीने सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन, 9.30 वाजता विविध क्षेत्रात पुरस्कार प्राप्त केलेल्या सन्माननीय व्यक्तिंचा सत्कार, तालुक्यातील 5000 मावळ्यांना फेटे बांधण्याचा कार्यक्रम, 10.30 वाजता उपस्थितांना मार्गदर्शन, 11 वाजता राष्ट्र शिवशाहीर बजरंग आंबी यांचा पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

दुपारी 12 वाजता बसस्थानकापासून पोलिस स्टेशनपर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. शिवाजी महाराज यांच्या जीवनातील घडलेल्या प्रसंगावर आधारीत जिवंत देखावे, शिवकालीन युध्दकला व मल्लखांब प्रात्यक्षिके, झांजपथक व लेझीमपथकासह ही मिरवणूक निघणार आहे. शहरात ठिकठिकाणी भव्य स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. भगवे ध्वज सर्वत्र लावण्यात आले आहेत.